मुंबईसह ठाणे, कोकण‍मध्ये येत्या काही तासांत मुसळधार पाऊस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे.

मुंबई : हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासात मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे.

मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मी.मी., सांताक्रुझ वेधशाळा येथे 118.3 मी.मी. इतका पाऊस झाला आहे. सकाळी 8:30 ते 11:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 30.00 मी.मी., सांताक्रुझ वेधशाळा येथे 121.4 मी.मी. इतका पाऊस झाला आहे, अशी माहिती मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षांने दिली आहे.

पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, कोकण विभागातील शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांना स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वे : वसई ते विरार रुळावर पाणी साचल्यामुळे त्या दरम्यानची लोकलसेवा बंद झाली आहे.

मध्य रेल्वे : सायन ते कुर्ला, विक्रोळी ते भांडुप येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी ते ठाणे लोकलसेवा बंद केली आहे.

हार्बर रेल्वे : चुनाभट्टी येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी ते वाशी लोकलसेवा बंद केली आहे.

पश्चिम रेल्वे माहिम ते माटुंगा दरम्यान पाणी साचल्यामुळे चर्चगेट ते अंधेरी दरम्यान रेल्वे वाहतूक बंद आहे.

वसई : नालासोपारा विरार येथे पाणी साचल्यामुळे वसई विरार रेल्वे वाहतूक बंद असून, अंधेरी ते वसई दरम्यान रेल्वे वाहतूक सुरू आहे.

दादर : ‍टिळक पूल, हिंदमाता जक्शन, कुर्ला- श्रध्दा जंक्शन, माला गार्डन, बंटर भवन, लायब्रेरी जंक्शन झोन आठ बीकेसी सायन – षण्मुखानंद हॉल, एस. आय. ई. एस कॉलेज, अंधेरी - एस.व्ही. रोड, अंधेरी सबवे, वडाळा सर्कल पंचायत या ठिकाणी पाणी साचले आहे.

रायगड : ताम्हणी घाट, माणगाव जवळ रस्त्यावर माती आली असल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. माती काढण्याचे काम सुरू असून, त्यानंतर सदर वाहतूक सुरू करण्यात येईल.

रायगडमधील कुंडलीका व अंबानदी यांनी धोक्याची पातळी गाठली असून, सदर नदीजवळील रस्ते वाहतुकीकरीता बंद करण्यात आले आहे.

गडचिरोलीमध्ये भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. भामरागड शहर येथे बाजारपेठमध्ये पाणी शिरले आहे.

पुणे : धरण क्षेत्रात सतत पाऊस सुरु असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खडकवासला येथून 24 हजार क्यूसेक व पवना धरणातून 9500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून सध्या शहरात पाऊस थांबला असून परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in Mumbai Thane and Kokan in Coming Hours