पुणे - बहुतांश राज्यात बरेच दिवस उघडीप दिल्यानंतर कोकण, मराठवाडा, वऱ्हाडसह विदर्भातील काही भागांत सोमवारी (ता.२१) पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. पाण्यावर आलेल्या पिकांना या पावसाने दिलासा मिळाला..विदर्भातील अकोला जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक मंडलांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसानही झाले. मराठवाड्यातील ३० मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात पातूर, बाळापूर तालुक्यांत पावसाने नुकसान केले.राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पावसाअभावी पिके धोक्यात आली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत तुषार सिंचनही सुरू केले होते. सोमवारी (ता. २१) सायंकाळी पुनरागमन केलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला..अकोला, बुलडाणा तसेच वाशीम जिल्ह्यांसह विदर्भ, मराठवाडा, कोकण घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली. काही महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. अचानक झालेल्या या मुसळधार पावसाने शेती व पिकांची धूळधाण झाली. विविध ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात सर्वाधिक १७१.८ मि.मी. पावसाची नोंद झाली..मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत अपवाद वगळता बहुतांश भागात आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने तुरळक, हलकी, मध्यम, दमदार ते जोरदार हजेरी लावली. जालना व बीड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता त्या दोन जिल्ह्यातील १२ मंडलांत अतिवृष्टी झाली.परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. सुकू लागलेल्या पिकांना पावसामुळे जीवनदान मिळाले असले तरी अतिवृष्टी झालेल्या मंडलांतील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, केळी आदी पिकांमध्ये पाणी साचले, जमिनी खरडून गेल्या. उसाचे पीक आडवे झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले..परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा यी तालुक्यांतील मंडलांत पावसाचा जोर होता. गंगाखेड, पालम तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असून कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. याशिवाय उर्वरित तालुक्यांमध्येदेखील जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सर्व नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यात भातरोप लागवडीला गती मिळाली आहे..आतापर्यत ४० हजार हेक्टरवर भातरोप लागवड पूर्ण झाली आहे. गेले अनेक दिवस किनारपट्टी भागात अपेक्षित पाऊस पडला नव्हता, परंतु गेल्या दोन दिवसांत या भागात देखील पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.