esakal | राज्यात मॉन्सून सक्रिय; अनेक ठिकाणी जोरदार हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

heavy-rain-in-maharashtra

कोकणातही पावसाला सुरुवात झाली आहे,तर विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी पडल्या.या पावसामुळे नद्या,नाले वाहते झाले असून,धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.

राज्यात मॉन्सून सक्रिय; अनेक ठिकाणी जोरदार हजेरी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर मराठवाड्यातही पावसाची रिपरीप सुरूच आहे. कोकणातही पावसाला सुरुवात झाली आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी पडल्या. या पावसामुळे नद्या, नाले वाहते झाले असून, धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. या पावसाने पेरणी झालेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे.

धुळे जिल्ह्यातील नंदाळे बुद्रुक येथे रविवारी (ता. २८) पहाटे साडेतीनच्या सुमारास ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाली. यामुळे साप नाल्याला मोठा पूर आला व पुराचे पाणी गावात शिरले. तसेच गावातील सुमारे दीडशे एकर शेती शिवारातही पाणी शिरल्याने पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाले. पावसामुळे पाच घरांची पडझड झाली. पावसामुळे गाव परिसरातील तलाव ओसंडून वाहिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बोरी धरणातून पाण्याचा विसर्ग 
जळगाव जिल्ह्यातील बोरी धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरण ८३ टक्के भरले. त्यामुळे धरणातून रविवारी (ता. २८) धरणाचे दोन दरवाजे ०.१५ मीटरने उघडून ९०३ क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडले.

नाशिकच्या पूर्व भागात दमदार नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने नांदगाव व मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. तर येवल्याच्या पूर्व भागातही रविवारी (ता. २८) काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मालेगाव तालुक्याच्या शहर परिसरसह पूर्व भागात झोडगे व निमगाव, पश्चिम भागात कौळाणे, सायने, दाभाडी परिसरातील गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. 

मराठवाड्यात पावसाची हजेरी
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ६८ मंडळांत सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. हिंगोली जिल्ह्यातील १४ मंडळांत मध्यम पाऊस  झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे जिल्ह्यातही जोरदार
पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात चांगलाच जोरदार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने पूर्व पट्ट्यातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळी पूर्व भागात जोरदार पाऊस झाला. इंदापूर येथे सर्वाधिक ८२.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यात पावसाचा जोर कमी आहे. 

वादळी पाऊस
राज्यात मंगळवारी (ता.३०) मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.