कागदपत्रांची काळजी घेणार ॲप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

सध्याचे युग हायटेक आहे. २, ३, ४ ‘जी’कडून ५ ‘जी’कडे वाटचाल सुरू आहे. स्मार्ट फोनने सर्वांच्या घरात स्थान मिळविले आहे. यातील विविध ॲपच्या माध्यमातून हवी ती माहिती क्षणात मिळविता येते. यात सर्वांत महत्त्वाचे ठरते ते ‘डीजी लॉकर’. या ॲपच्या साहाय्याने तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे वर्षानुवर्षे जपून ठेवू शकता.

नांदेड - सध्याचे युग हायटेक आहे. २, ३, ४ ‘जी’कडून ५ ‘जी’कडे वाटचाल सुरू आहे. स्मार्ट फोनने सर्वांच्या घरात स्थान मिळविले आहे. यातील विविध ॲपच्या माध्यमातून हवी ती माहिती क्षणात मिळविता येते. यात सर्वांत महत्त्वाचे ठरते ते ‘डीजी लॉकर’. या ॲपच्या साहाय्याने तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे वर्षानुवर्षे जपून ठेवू शकता. आपला स्मार्ट फोन जवळ असला, की क्षणात हवी ती कागदपत्रे सादर करता येतात.

वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना सर्व कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्‍यक आहे. वाहतूक विभागाच्या कारवाईच्या वेळी सर्व कागदपत्रे दाखविणे गरजेचे असते. अनेकदा कागदपत्रे उपलब्ध नसल्यास वाहनचालकांना दंडाला सामोरे जावे लागते. यासह शासकीय कामकाज आणि मुलाखतीच्या वेळी कागदपत्रांची आवश्‍यकता पडते. मात्र, ही कागदपत्रे अचानक गहाळ झाली तर तातडीने उपलब्ध करता न आल्यास काय करावे, असा प्रश्न नागरिकांना पडतो. यावर केंद्र शासनाने तोडगा काढला आहे. सर्वश्रुत ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत ‘डीजी लॉकर’ ॲपची सुविधा स्मार्ट फोनमध्ये उपलब्ध केली आहे. या ॅपवर महत्त्वाची कागदपत्रे आधार, पॅनकार्ड, गॅसचे बिल, रेशनकार्ड क्षणात मिळविता येतात. डीजी लॉकरमुळे कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी संग्रही ठेवता येणार आहे. एका क्‍लिकवर कागदपत्रे मोबाईलवर उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर या प्रतीची प्रिंटदेखील काढता येते. डीजी लॉकरमधील कागदपत्रे ग्राह्य असल्याचे शासनाचे आदेश आसल्याने यापुढे नागरिकांना कागदपत्रांची फाइल बाळगण्याची गरज नाही.

अशी करा कागदपत्रे अपलोड 
प्ले स्टोअरद्वारे डीजी लॉकर डाऊनलोड करता येतो. ॲप डाऊनलोड केल्यानंतर आधारकार्ड, मोबाईल नंबरद्वारे लॉगइन करता येते. यानंतर लिंक नंबरवर येणाऱ्या ओटीपीद्वारे डीजी लॉकर खाते सुरू होते. या खात्यावर नागरिकांना शासकीय कागदपत्रांसह स्वतःची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करता येईल. जी वर्षानुवर्षे जपून राहतील. ही सर्व कागदपत्रे डीजी लॉकरमध्ये पीडीएफ, जेपीईजी, पीएनजी यात अपलोड करता येतात.

डीजी लॉकरचा फायदा
नागरिक त्यांची कागदपत्रे केव्हाही आणि कुठेही पाहू शकतात. परवाना आणि प्रमाणपत्रे ॲपवर उपलब्ध होतात. कागदपत्रे गहाळ झाली तरी काळजी करण्याचे कारण नाही. प्रमाणपत्रे डिजिटल स्वाक्षरीसह क्‍यूआर कोड असल्याने फसवणूक होण्याचीही शक्‍यता नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of DG Locker App you can keep your important documents stored for years