मदतीच्या हातांमुळे तिला मिळाले जीवदान

प्रथमा शिरोडकर
Thursday, 12 March 2020

कर्करोग तपासणी शिबिरासाठी एखाद्या लहान गावात महिलांमध्ये जनजागृती करून त्यांना तपासणीसाठी आणणे, हे सोपे काम नाही. भिवंडीतील खोणी गावातील तनिष्कांनी हे काम केलेच शिवाय जिला कर्करोगाची लक्षणे आढळली, तिच्यासाठी मदतीचे हात पुढे करून जीवदान दिले.

भिवंडी - कर्करोग तपासणी शिबिरासाठी एखाद्या लहान गावात महिलांमध्ये जनजागृती करून त्यांना तपासणीसाठी आणणे, हे सोपे काम नाही. भिवंडीतील खोणी गावातील तनिष्कांनी हे काम केलेच शिवाय जिला कर्करोगाची लक्षणे आढळली, तिच्यासाठी मदतीचे हात पुढे करून जीवदान दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खोणीतील गटप्रमुख कोमल शिंगोळे यांच्या गटाने दोन वर्षांपूर्वी कर्करोग तपासणी शिबिर घेण्याचे ठरवले. महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात. तपासणीला घाबरतात, असे सगळ्यांचे निरीक्षण होते. इंडियन कॅन्सर सोसायटीने पहिल्या शंभर जणींसाठी तपासणी मोफत करण्याची तयारी दाखवली. ३० ऑक्‍टोबर २०१८ रोजी झालेल्या शिबिराला सुमारे २५० महिला आल्या. मॅमोग्राफी, पॅप स्मियर आदी तपासण्या झाल्या. चाचण्यांचे रिपोर्ट २२ दिवसानंतर मिळाले. दोघींमध्ये लक्षणे आढळल्याने टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पुन्हा सर्व तपासण्या केल्या. त्यातील एकीला स्तनाचा कर्करोग झाला होता. तिला याची काहीच कल्पना नव्हती. ती घाबरली होती. तिला तनिष्कांनी धीर दिला. यापुढे कोणतीही मदत हवी असेल तर ती आम्ही करू, असा विश्वास दिला. 

संबंधित महिलेची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. ती कारखान्यामध्ये स्वच्छतेचे काम करते, नवरा हमाली करतो. तिला लहान मुलगा आहे. या परिस्थितीमुळे तनिष्का गटाने आर्थिक मदत केली. तिला टाटा हॉस्पिटलमध्ये तनिष्का सदस्या स्वखर्चाने घेऊन जात. चार केमोथेरपी मोफत होतील, याचीही काळजी घेतली. तनिष्कांनी महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गतही मदत मिळवून दिली. त्यातून तिचा पुढील शस्त्रक्रियेचा खर्च भागला. इंडियन कॅन्सर सोसायटीने औषधोपचार, तपासण्यांसाठी मदतीचा हात दिला. 

एकीचे प्राण वाचवल्यानंतर प्रत्येक महिलेने वेळेवर आवश्‍यक तपासण्या करून घ्याव्यात, असे सांगण्याचा वसाच आता खोणीतील तनिष्कांनी घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of her hands she received a living