Motivational Story: आयुष्यभर साहेबांना सलाम ठोकणाऱ्या शिपाई बापाची मुलगी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Motivational Story: आयुष्यभर साहेबांना सलाम ठोकणाऱ्या शिपाई बापाची मुलगी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश
आयुष्यभर साहेबांना सलाम ठोकणाऱ्या शिपाई आई-वडीलांची स्नेहा पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश

Motivational Story: आयुष्यभर साहेबांना सलाम ठोकणाऱ्या शिपाई बापाची मुलगी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश

सोलापूर : आई उज्ज्वला जिल्हा आरोग्य विभागात शिपाई तर वडील सुनील हेही जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत शिपाईच. तीन मुलांचा सांभाळ करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना त्यांना नेहमीच काटकसर करावी लागायची.

तरीपण, मुले नोकरीला लागली की परिस्थिती नक्की बदलेल, ही जिद्द उराशी बाळगून आई-वडिलांनी पोटाला चिमटा घेतला. ही जाण ठेवत मुलीने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली. स्नेहा सुनील पुळूजकर (रा. शेळगी, सोलापूर) ही नुकत्याच न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

सोलापुरात अनेक वर्षांपासून सुनील व उज्ज्वला यांचा भाड्याच्या घरातच संसार सुरू होता. सुजित, सुयश व स्नेहा अशी त्यांना तीन मुले. आई-वडिलांनी स्वत:चे घर विकत घेण्यापेक्षाही मुलांच्या शिक्षणाला पहिले प्राधान्य दिले.

मुलांनीही आई-वडिलांचे संस्कार व शिकवणुकीवर वाटचाल करीत उच्चशिक्षण घेतले. आता मोठा मुलगा सुजित बंगळूर येथे स्वॉफ्टवेअर इंजिनिअर असून सुयश सोलापूर न्यायालयात वकिली करतोय. तत्पूर्वी, पहिली ते दहावीपर्यंत स्नेहाचे शिक्षण सेवासदन प्रशालेत पार पडले.

दहावीत तिने ९३ टक्के गुण मिळवले. अकरावी-बारावी दयानंद विज्ञान महाविद्यालयातून पूर्ण केले. पुढे शिकून नोकरी करावी, या हेतूने स्नेहाने ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये तिने विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवले. आई उज्ज्वला यांना मुलीवर खूप विश्वास होता. त्यांनी तिला शिक्षणासाठी काहीच कमी पडू दिले नाही.

स्नेहाने पुन्हा दयानंद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अंतिम वर्षात असताना तिने ‘एमपीएससी’ची तयारी सुरू केली. ॲड. ए. बी. अंदोरे, ॲड. सत्यनारायण माने, ॲड. गणेश पवार यांनी तिला मदत केली.

आई-वडील नोकरीला गेल्यावर घरातील कामे करून स्नेहा अभ्यास करायची. पण, आईने तिला नेहमीच पाठबळ दिले.

महागडी पुस्तकांसाठी खर्च करण्याएवढीही चांगली आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे स्नेहाने दररोज १५ ते १८ तास अभ्यास केला आणि नोट्‌स काढल्या. अखेर आई-वडिलांचे स्वप्न स्नेहाने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर पूर्ण करून दाखवलेच.

आईला वाटायचे, मुलगीही साहेब व्हावी

स्नेहाचे वडील सुनील जिल्हा बॅंकेत आणि आई उज्ज्वला आरोग्य विभागात शिपाई. ते दोघेही दररोज त्यांच्या मोठ्या साहेबांना महागड्या गाडीतून येताना- जाताना पाहायचे.

आपली मुलगीही तशीच साहेब व्हावी, असे स्वप्न उज्ज्वला यांनी पाहिले. त्यादृष्टीने त्यांनी स्नेहाला साथ दिली.

मुलीचे वय वाढत होते, नातेवाईक देखील विवाहासाठी आग्रह करीत होते; पण उज्ज्वला यांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष न देता स्नेहाला अभ्यासासाठी नेहमी बळ दिले.

रेल्वेत ‘लोकोपायलट’ची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्नेहाला डोळ्यावरील चष्म्यामुळे मेडिकलमधून माघारी फिरावे लागले.

तरीपण, अपयश ही यशाची पहिली पायरी मानून आई उज्ज्वला यांनी स्नेहाने पाहिलेल्या स्वप्नांच्या पंखांना ताकद दिली. अखेर तो दिवस उजाडला, स्नेहाचा ‘एमपीएससी’चा निकाल लागला आणि आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.