राज्यातील दोन मार्गांवर बुलेट ट्रेन ! मुंबई-हैदराबाद व मुंबई-नागपूर मार्गाचा तयार होतोय आराखडा 

तात्या लांडगे 
Wednesday, 30 December 2020

बुलेट ट्रेनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची सोय व्हावी, वैद्यकीय अडचणींवर तत्काळ मात करता यावी, कमीत कमी वेळेत प्रवासाच्या ठिकाणी पोचता यावे, प्रदूषण कमी व्हावे, व्यापार, रोजगार वाढावा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर व्हाव्यात, नोकरदारांचे प्रश्‍न सुटावेत, या हेतूने बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 

सोलापूर : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार नॅशनल हायस्पीड रेल्वे विभागातर्फे देशातील पाच मार्गांवरील प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील मुंबई ते हैदराबाद आणि मुंबई ते नागपूर या दोन मार्गांचा समावेश आहे. दोन्ही मार्गांचा सर्व्हे सुरू झाला असून, डिसेंबर 2021 पर्यंत "डीपीआर' केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. 

बुलेट ट्रेनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची सोय व्हावी, वैद्यकीय अडचणींवर तत्काळ मात करता यावी, कमीत कमी वेळेत प्रवासाच्या ठिकाणी पोचता यावे, प्रदूषण कमी व्हावे, व्यापार, रोजगार वाढावा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर व्हाव्यात, नोकरदारांचे प्रश्‍न सुटावेत, या हेतूने बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये दिल्ली ते वाराणसी (865 किमी), दिल्ली ते अहमदाबाद (886 किमी), दिल्ली ते अमृतसर (459 किमी), मुंबई ते हैदराबाद (711 किमी), मुंबई ते नागपूर (753 किमी), चेन्नई ते म्हैसूर (435 किमी) आणि वाराणसी ते हावडा (760 किमी) या पाच मार्गांचा समावेश आहे. यातील बहुतेक मार्ग सोलर एनर्जीवर आधारित असणार आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यात दिल्ली ते अहमदाबाद या मार्गाचे काम सुरू केले जाणार असून, त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. वन्यजीव, वनीकरण व किनारपट्टी नियमनची मंजुरी घेतली असून, वृक्षतोड होणाऱ्या ठिकाणी 73 हजार वृक्षलागवडीचेही नियोजन केल्याची माहिती हायस्पीड रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बुलेट ट्रेनच्या मार्गांवर मोजकेच थांबे दिले जातील, असेही सांगण्यात आले. 

देशात पाच हजार किलोमीटरचे बुलेट ट्रेनचे जाळे 
देशातील पाच मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने सर्व्हेचे काम सुरू झाले असून, दिल्ली-वाराणसी या मार्गाचा "डीपीआर' केंद्रीय रेल्वे मंत्रालयास सादर केला आहे. उर्वरित चार मार्गांचाही "डीपीआर' तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 
- सुष्मा गौर, 
अतिरिक्‍त महाव्यवस्थापक, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, दिल्ली 

ठळक बाबी... 

  • प्रतितास 300 किलोमीटर वेग असल्याने कमीत कमी कालावधीत दूरचा प्रवास शक्‍य 
  • पर्यटन वाढीस मिळेल चालना; स्पर्धेच्या काळात बुलेट ट्रेनच्या माध्यमातून नवी शहरे जोडण्याचे नियोजन 
  • पाच वर्षांत देशात पाच हजार किलोमीटरचे बुलेट ट्रेनचे जाळे उभारण्याचे केंद्र सरकारचे नियोजन 
  • बुलेट ट्रेनच्या प्रत्येक मार्गासाठी असेल स्वतंत्र लेन; डिसेंबर 2021 पर्यंत पाचही मार्गांचे तयार होणार "डीपीआर' 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High speed bullet train to be launched on five routes in the country