उदय सामंत म्हणाले...'अंतिम' परीक्षेवर सायबर अटॅक ! तीन विद्यापीठांचे गाऱ्हाणे

तात्या लांडगे
Friday, 9 October 2020


...तर विद्यापीठानेच करावी कारवाई 
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे परीक्षा घेताना सायबर अटॅक झाल्यास त्याची चौकशी, कारवाई करण्याचा अधिकार संबंधित विद्यापीठालाच असणार आहे. यंत्रणेअंतर्गत काही गैरप्रकार झाल्यास राज्य सरकार निश्‍चितपणे दोषींवर कारवाई करेल, असेही सामंत म्हणाले. तांत्रिक अडचणींमुळे, कोरोनामुळे तथा नापास विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठांनी वेळेतच घ्यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

सोलापूर : अंतिम वर्षाच्या परीक्षेवर बाहेरुन सायबर अटॅक झाल्याचा आरोप मुंबई, गोंडवाना आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केला आहे. त्यातील सोलापूर विद्यापीठाने सायबर पोलिसांत धाव घेतली आहे. तत्पूर्वी, ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाने निवडलेल्या कोणत्याही व्हेंडरला राज्य सरकारची परवानगी नाही, असा धक्‍कादायक खुलासा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सोलापुरात केला. त्यामुळे भविष्यातील अडचणींवर राज्य सरकारऐवजी विद्यापीठाकडूनच कारवाई अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची घरबसल्या ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. राज्यातील सात लाखांहून अधिक विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देत आहेत. सुरवातीला एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन झाले असून त्यानंतर नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा 31 ऑक्‍टोबरपर्यंत घेतली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षेत नापास झालेल्या तथा तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा तत्काळ घेतली जाणार आहे. तत्पूर्वी, कोरोनासह अन्य अडचणींमुळे परीक्षा घेऊनच नये, अशी राज्य सरकारची ठाम भूमिका होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार परीक्षा घेतली जात आहे, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. विद्यापीठांच्या व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षांवेळी येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठांचीच असल्याचे सामंत म्हणाले. 

प्राध्यापक अन्‌ प्राचार्यांची लवकरच भरती 
वित्त विभागाने 4 मे रोजी परिपत्रक काढले असून त्यानुसार आरोग्य वगळता अन्य कोणत्याही विभागाला नव्या पदभरतीस मान्यता दिलेली नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया बंद असून तरीही विद्यार्थ्यांना शिक्षण देताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती करण्याचे नियोजन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहे. तर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्‍ती करताना सेट तथा नेट उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य असणार आहे. एखाद्या विषयासाठी सेट तथा नेटचा उमेदवार न मिळाल्यास उच्चशिक्षित उमेदवाराची निवड केली जाईल, असेही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

...तर विद्यापीठानेच करावी कारवाई 
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे परीक्षा घेताना सायबर अटॅक झाल्यास त्याची चौकशी, कारवाई करण्याचा अधिकार संबंधित विद्यापीठालाच असणार आहे. यंत्रणेअंतर्गत काही गैरप्रकार झाल्यास राज्य सरकार निश्‍चितपणे दोषींवर कारवाई करेल, असेही सामंत म्हणाले. तांत्रिक अडचणींमुळे, कोरोनामुळे तथा नापास विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठांनी वेळेतच घ्यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Higher and Technical Education Minister Uday Samant said ... Cyber ​​attack on 'final' exam! Complaints of three universities