पुण्यातील पावसाचा राज्यात सातवा क्रमांक;सर्वाधिक पाऊस नगर जिल्ह्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

यंदा नगर येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे, सरासरीच्या ८० टक्के जास्त पावसाची नोंद झाली. तेथे १ जून ते १३ सप्टेंबर दरम्यान ३३७ मिलीमीटर पाऊस पडतो. या वर्षी आतापर्यंत ६०५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पुणे - राज्यात यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस नगर जिल्ह्यात पडला असून, औरंगाबाद दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि धुळ्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. 

राज्यात गेल्या चार महिन्यात १०२९.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत १३ टक्के जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. यंदा नगर येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे, सरासरीच्या ८० टक्के जास्त पावसाची नोंद झाली. तेथे १ जून ते १३ सप्टेंबर दरम्यान ३३७ मिलीमीटर पाऊस पडतो. या वर्षी आतापर्यंत ६०५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल औरंगाबादमध्ये ६३ टक्के पाऊस पडला. बृहन मुंबई आणि मंबई उपनगरमध्येही दमदार पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे तेथे अनुक्रमे ६१ आणि ५९ टक्के पावसाची नोंद झाली. धुळ्यातही यंदा ४७ टक्के पाऊस नोंदला गेला. तेथे सरासरी ४६१.४ मिलीमीटर पाऊस पडतो. या पावसाळ्यात ६७८.६ मिलीमीटर पाऊस पडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात पावसाळ्यात ७४६.६ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा १०७३.७ मिलमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा ४४ टक्के जास्त पाऊस पडला असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

आठवडाभर मुसळधार पाऊस
दक्षिण गुजरातची किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक व उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. यामुळे आठवडाभर राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. आजपासून (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 उत्तर भारतात असलेला मॉन्सूनचा आस बिकानेर, सिकर, शिवपुरी, मांडलापर्यंत असून बंगालच्या उपसागराच्या पश्‍चिमेमध्ये भाग व उत्तर आंध्र प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. जम्मू आणि काश्‍मीर व परिसरात समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ३.६ किलोमीटरच्या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हवामानाची स्थिती
  अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती 
  उत्तर प्रदेशचा आग्नेय भागात कमी दाबाचे पट्टा 
  अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती 
  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highest rainfall in the state this year was in Nagar district