esakal | महापालिकेची सर्वसाधारण सभा हुतात्मा स्मृती मंदिरात घ्या 
sakal

बोलून बातमी शोधा

smc

जुने सभागृह तोडण्यास विरोध 
सोलापूर महापालिकेचे जुने सभागृह तोडून आयुक्तांचे कार्यालय करत असल्याची ही बाब अतिशय चुकीची व गंभीर असल्याचे या वेळी निदर्शनास आणून दिले. जुन्या सभागृहाचे सुशोभीकरण करण्याऐवजी मनपा आयुक्तांचे कार्यालय करणे हे चुकीचे आहे. अप्पासाहेब काडादी यांचा वारसा असणारे सभागृह बदलून त्या ठिकाणी आयुक्तांचे दालन करणे चुकीचे आहे. जुने सभागृह हे सोलापूर शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या जुन्या नेत्यांची एक अस्मिता आहे. ही अस्मिता तोडून तिथे कार्यालय करणे योग्य नसल्याचा आक्षेप गटनेत्यांनी घेतला. 

महापालिकेची सर्वसाधारण सभा हुतात्मा स्मृती मंदिरात घ्या 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची चार महिने सभा घेतली नाही. जुलैची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्स सभेला कॉंग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम व भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी यापूर्वी विरोध दर्शविला होता. तरी देखील महापालिकेने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्याचे नियोजन केले आहे. सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न घेता हुतात्मा स्मृती मंदिरात घ्यावी अशी मागणी महापालिकेतील गटनेत्यांनी केली आहे. 

गटनेत्यांनी आज सात रस्ता येथील नियोजन भवनात महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. यावेळी माजी सभागृह नेते नगरसेवक सुरेश पाटील, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, एमआयएमचे गटनेते रियाज खैरादी यांच्यासोबत सुमारे एक तास बैठक झाली.

मनपा आयुक्त नवीन असल्याने अधिकारी व नगरसेवकांची बाजू समजून घेऊन सोलापूरच्या विकासाच्या संदर्भात नव्या आयुक्तांना माहिती होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न घेता हुतात्मा स्मृती मंदिरात घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या कामाच्या विभागणीवरही सर्वपक्षीय गटनेत्यांनी आक्षेप घेतला.