गृहमंत्री देशमुख शनिवारी सोलापूर, पंढरपूरच्या दौऱ्यावर 

प्रमोद बोडके
Friday, 26 June 2020

सोनक्‍यात आर. आर. पाटलानंतर देशमुख 
सोलापूरचे माजी आमदार दिपक साळुंखे यांचा सोनके (ता. पंढरपूर) येथील फार्म हाऊस प्रसिध्द आहे. महाराष्ट्राचे तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर ते या फार्म हाऊसला आवर्जून जात. सोलापूरच्या दौऱ्यावर येत असलेले गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील आता या फार्म हाऊसवर जाणार आहेत. 

सोलापूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख शनिवार (ता. 27) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी सकाळी सात वाजता पुणे येथून मोटारीने ते सोलापूरला येणार आहेत. शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 वाजता स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.

सोलापूर येथून पंढरपूरला जाणार असून पंढरपूर तालुक्‍यातील सोनके येथील माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या फार्म हाउसवर ते मुक्काम करणार आहेत. 
शनिवारी सकाळी 11:30 ते दुपारी दीड या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गाने उद्भवलेल्या परिस्थितीचा, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पूर्वतयारीबाबत ते आढावा बैठक घेणार आहेत.

या वेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्य चिकित्सक, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी उपस्थित असतील. 
दुपारी पावणे दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून ते मोटारीने पोलिस आयुक्त कार्यालयात जाणार आहेत. दुपारी दोन वाजता पोलिस आयुक्तालय येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

त्यानंतर अडीच वाजता शासकीय विश्रामगृह येणार असून तेथून मोटारीने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. साडेचार वाजता पंढरपूर येथे त्यांचे आगमन होणार असून दुपारी साडेचार ते सायंकाळी सात या वेळेत ते विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर परिसराची पाहणी करणार आहेत. सायंकाळी सात वाजता पंढरपूर येथून मोटारीने सोनके येथे जाणार आहेत. सोनके येथे मुक्काम करून रविवारी सकाळी सात वाजता मोटारीने सांगलीला जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Deshmukh on a visit to Solapur, Pandharpur on Saturday