Inflation : सर्वसामान्यांच्या ताटातील वरण-भातसुद्धा महागला; डाळीनंतर तांदळाचा भावही वाढला

डाळीनंतर तांदळाचा भावही वाढला; कालीमूछ, चिनोर, बासमतीची दरवाढ
household budget collapse as food grains inflation
household budget collapse as food grains inflationSakal

जळगाव : गतवर्षी झालेल्या कमी पावसामुळे यंदा तांदळाच्या उत्पादनात घट झाली. परिणामी आता पावसाळ्याच्या तोंडावर दरवाढ झाली आहे. डाळीचे दर गगनाला भिडल्यानंतर तांदूळही महागला आहे. गेल्या वर्षी साधा कालीमूछ तांदूळ साडेचार हजार रुपये क्विंटल होता. तो यंदा साडेपाच हजार रुपये क्विंटलवर पोहोचला आहे.

चिनोरचे दर ६ हजार रुपयांवरून ७२०० ते ७५०० रुपयांवर पोचले आहेत. सोबतच इतर सर्व प्रकारातील तांदळाची दरवाढ झाली आहे. बाजारात सध्या पॉलिश न केलेल्या इंद्रायणी, आंबेमोहोर या तांदळांना अधिक मागणी आहे.

अनपॉलिश्ड इंद्रायणी ६५०० रुपये तर आंबेमोहोर ७८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. गेल्या आठवडाभरात वाढलेल्या तांदळाच्या दरामुळे सामान्यांच्या घराचे बजेट बिघडले आहे. ग्राहकांकडून होणाऱ्या तांदळाच्या वार्षिक खरेदीवर परिणाम झाला आहे.

तांदूळ हा आपल्या जेवणातील अविभाज्य घटक बनला आहे. बिर्याणीपासून खीर, इडली, डोसा आदी चविष्ट पदार्थ यापासून तयार होतात. त्यामुळे तांदळाला मागणी आहे.

मागणीमुळे झाली दरवाढ

गेल्या काही वर्षांत तांदळाच्या विविध प्रकारांना मागणी वाढली आहे. बिर्याणी, पुलाव, जिरा राईस आदींसाठी बासमतीचे विविध प्रकार ग्राहकांकडून खरेदी केले जातात. तांदळाची मागणी वाढली असली तरी उत्पादनात मात्र घट झाल्याने त्याचे परिणाम दरवाढीत झाले.

तूरडाळ १८० रुपये किलोवर

गेल्या १५ दिवसांत डाळींचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गेल्या पंधरवड्यात १४० ते १४२ रुपये किलो दराने विक्री होणारी तूरडाळ आता १८० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. हरभरा डाळीचे दर ७० ते ७२ रुपये किलोवरून ९० ते ९२ रुपये किलोवर गेले आहेत.

उडीद डाळ ११२ रुपये किलो होती. सध्या या डाळीचे दर १३० ते १३२ रुपये किलो आहेत. डाळ तसेच तांदूळ महागल्याने सर्वसामान्यांच्या दररोजच्या ताटातील वरणभाताची ‘चव’ही बिघडली आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळात २० ते २२ टक्के दरवाढ आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने उत्पादनात घट झाली. एप्रिल महिन्यात काढणी होणाऱ्या तांदळाचे उत्पादनसुद्धा घटले. यामुळे तांदळाच्या दरात वाढ झाली आहे.

- प्रशांत समदाणी, व्यापारी, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com