

तात्या लांडगे
सोलापूर : शासकीय, खासगी नोकरीसह प्रवासी वाहनांचा बॅच काढताना, राजकारणात उमेदवारी अर्ज भरताना चारित्र्य पडताळणी दाखला लागतोच. हा दाखला आता ऑनलाइन, तोही सात दिवसांत मिळणार आहे. अर्जदारास पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवण्याची आवश्यकता नाही. गावातील महा ई-सेवा केंद्रांवरून ते अर्ज करू शकतात. त्यासाठी १५९ रुपयांचे शुल्क ऑनलाइन भरावे लागते.
चारित्र्य पडताळणी दाखल्यासाठी अर्ज केल्यावर पोलिस संबंधित उमेदवारांवरील दाखल गुन्ह्यांची माहिती काढतात. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रात उमेदवाराविरुद्ध एक जरी गुन्हा दाखल असेल, तर त्याला नोकरी मिळत नाही. अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल झाला असेल, तर तो या पडताळणीत गृहीत धरला जात नाही. कारण, त्याचा निर्णय सहा महिन्यांतच होतो. चारित्र्य पडताळणी दाखल्यासाठी उमेदवाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड व एक फोटो अपलोड करावा लागतो. उमेदवारांना https:// pcs.mahaonline.gov.in/ Forms/Home.aspx या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येतो.
स्थानिक पोलिसांकडे उमेदवाराचा अर्ज आल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याकडून त्याची पडताळणी केली जाते. गृहभेटदेखील केली जाते. त्यानंतर सात दिवसांत त्याला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र वितरित केले जाते. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विनाविलंब चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र उमेदवारांना मुदतीत दिले जाते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चारित्र्य पडताळणी दाखला कुठे लागतो?
ॲटोरिक्षा, स्कूल बससह खासगी-शासकीय प्रवासी वाहनांवरील चालकाला लायसन्ससोबत बॅचदेखील काढावा लागतो. त्यावेळी पोलिस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र (चारित्र्य पडताळणी) बंधनकारक असते. याशिवाय पासपोर्ट काढण्यापूर्वी आणि पायलट, हवाई सुंदरीच्या नोकरीसाठीदेखील ते प्रमाणपत्र लागतेच. निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांना देखील अर्जासोबत चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र जोडावे लागते. तसेच सरकारी नोकरीसाठी तर हे प्रमाणपत्र बंधनकारकच आहे. आता खासगी नोकऱ्यांसाठीदेखील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राचे बंधन घातले जाते.
शासनाच्या वेबसाईटवरून अर्ज करता येईल
सोलापूर ग्रामीणमधील २५ पोलिस ठाण्यांतर्गत दररोज ८० ते ९० लोक चारित्र्य पडताळणीसाठी (पोलिस व्हेरिफिकेशन) ऑनलाइन अर्ज करतात. त्यांना जास्तीत जास्त सात दिवसांत आम्ही ते प्रमाणपत्र ऑनलाइनच देतो. शासनाच्या वेबसाइटवरून उमेदवारांना अर्ज करावा लागतो. त्याच वेबसाइटवरून उमेदवारांना चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र काढता येते.
- चंद्रकांत पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सोलापूर ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.