व्यावसायिक अभ्यासक्रमांना उतरती कळा, चार वर्षात घटले तब्बल एवढे विद्यार्थी...

मंगेश गोमासे
Saturday, 27 June 2020

राज्यात गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयात बरीच वाढ झाली. एमबीए, अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, पॉलिटेक्‍निक, एमसीए आणि अप्लाइड आर्ट ऍण्ड क्राफ्ट या विषयांचा समावेश आहे. यामध्ये व्यवस्थापन शाखेची 367 महाविद्यालये असून त्यात 52 हजार 127 जागांचा समावेश आहे. अभियांत्रिकी शाखेत (पॉलिटेक्‍निक, एम.टेक) 711 महाविद्यालये असून त्यात 2 लाख 70 हजार 967 जागा, आर्किटेक्‍चरच्या 26 महाविद्यालयात 2 हजार 66, फार्मसी अभ्यासक्रमात 551 महाविद्यालयात 51 हजार 737 तर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील 17 महाविद्यालयात 1 हजार 272 जागांचा समावेश आहे.

नागपूर  : पुरोगामी महाराष्ट्र शिक्षणात बराच पुढारलेला आहे. नामवंत शिक्षण संस्थांमुळे राज्याचा नावलौकिक आहे. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसून येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चार वर्षांत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांतून जवळपास 57 हजार 641 विद्यार्थी घटले असून, 2019-20 या वर्षात 14 हजार 569 विद्यार्थ्यांची घट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयात बरीच वाढ झाली. एमबीए, अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, पॉलिटेक्‍निक, एमसीए आणि अप्लाइड आर्ट ऍण्ड क्राफ्ट या विषयांचा समावेश आहे. यामध्ये व्यवस्थापन शाखेची 367 महाविद्यालये असून त्यात 52 हजार 127 जागांचा समावेश आहे. अभियांत्रिकी शाखेत (पॉलिटेक्‍निक, एम.टेक) 711 महाविद्यालये असून त्यात 2 लाख 70 हजार 967 जागा, आर्किटेक्‍चरच्या 26 महाविद्यालयात 2 हजार 66, फार्मसी अभ्यासक्रमात 551 महाविद्यालयात 51 हजार 737 तर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील 17 महाविद्यालयात 1 हजार 272 जागांचा समावेश आहे.

कसे सांभाळणार शाळांचे अर्थकारण, सॅनिटायझेशनवर करावा लागेल तब्बल एवढा खर्च

गेल्या तीन वर्षांत अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्‍निक महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची संख्या सातत्याने वाढली आहे. याचाच फटका जवळपास राज्यातील प्रवेशाला बसला असून राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये घट दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांपासून चार वर्षांत 57 हजार 641 प्रवेश कमी झाले आहे. त्यामुळे बरीच महाविद्यालये बंद करण्यात आलेली आहेत.
दरम्यान, आता कोरोनाचे संकट आल्याने बऱ्याच महाविद्यालयांच्या प्रवेशावर त्याचा प्रभाव दिसून येणार असल्याने भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्‍यता आहे.

फार्मसी, एमबीएमध्ये वाढले प्रवेश
एकीकडे अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा असताना, दुसरीकडे गेल्या तीन वर्षांपासून फार्मसी अभ्यासक्रमात तर एका वर्षापासून व्यवस्थापन अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. 2016-17 ते 2019-20 या कालावधीत फार्मसी अभ्यासक्रमात जवळपास पंधरा हजारांनी प्रवेश वाढले आहेत. याशिवाय व्यवस्थापन अभ्यासक्रमात अडीच हजारांची वाढ दिसून आलेली आहे.

दृष्टिक्षेपात आकडेवारी
वर्ष - प्रवेश
2016-17 - 4,43,347
2017-18- 4,20, 861
2018-19 - 4,00,275
2019-20 - 3,85,706

राज्यातील अशा प्रकारे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ फिरविणे हे गंभीर चित्र आहे. याला व्यवस्था कारणीभूत असून शिकल्यावर नोकरीची उपलब्धता नसल्यास त्या अभ्यासक्रमाकडे कल जात नाही. अभियांत्रिकी शाखेत नावीन्य आणल्यास नोकरीची संधी निर्माण होऊ शकते. प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न करावा.
-डॉ. प्रशांत कडू, प्राचार्य, आभा गायकवाड पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how many students dropped in the state in four years