राणेंच्या भाजप प्रवेशाला कसा घातला मोडता?

महेश पांचाळ
सोमवार, 10 एप्रिल 2017

नारायण राणे यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घ्यावे लागेल. रिकामे ठेवल्यास पक्षांच्या धोरणाविरोधात टिका करण्यास ते मागे पुढे पहाणार नाहीत. त्यांना पक्षवाढीपेक्षा दोन मुलांच्या राजकीय भविष्याची चिंता असते, असा सूर शहा यांच्यापर्यंत गेल्याने त्यांनीही राणे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत अधिक उत्सुकता दाखवली नसल्याचे समजते.

मुंबई : माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा अनुकूल होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याने शहा यांनीही राणे यांना प्रवेश देण्याबाबत फारसा रस घेतला नसल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील राणे यांच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रांगणात आज 65 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राणे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या या आधी समजत होत्या. कार्यक्रमासाठी नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याने हॅलिपॅडची व्यवस्था करण्याचे कामही स्थानिक पातळीवर केले जात होते. मात्र, अचानक राणे यांनी दिल्ली येथे जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस पक्षांचे काम करत राहणार असल्याचे स्पष्ट केले.


केद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राणे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. पक्षांच्या मर्यादा असतानाही दोन्ही नेत्यांनी मैत्रीचे संबंध कायम राखले. राणे यांच्यासारखा मातब्बर नेता भाजपमध्ये आल्यास शिवसेनेच्या विरोधात आयती तोफ मिळेल तसेच भाजपला त्याचा फायदा होईल, असे शहा यांना पटवून देण्यात गडकरी यांनी यशस्वी झाले होते. शहा यांनी यासंदर्भात फडणवीस यांच्याशी चर्चा केली असता, फडणवीस यांच्याकडून राणे यांच्या भाजप प्रवेशाला खो मिळाला, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 


राणे यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घ्यावे लागेल. रिकामे ठेवल्यास पक्षांच्या धोरणाविरोधात टिका करण्यास ते मागे पुढे पहाणार नाहीत. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मंत्री असतानाही तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात राणे यांनी आगपाखड केली होती. राणे यांना पक्षवाढीपेक्षा दोन मुलांच्या राजकीय भविष्याची चिंता असते, असा सूर शहा यांच्यापर्यंत गेल्याने त्यांनीही राणे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत अधिक उत्सुकता दाखवली नसल्याचे समजते.

Web Title: How Narayan Rane was restricted from joining BJP