पवारांनी कॅन्सरविरुद्धची लढाई जिद्दीने जिंकली अन् राज्यात गुटखाबंदी आली | Ketaki Chitale controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar won cancer battle

पवारांनी कॅन्सरविरुद्धची लढाई जिद्दीने जिंकली अन् राज्यात गुटखाबंदी आली..

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी लिहीलेल्या वादग्रस्त पोस्टची सध्या चर्चा होतेय. तिच्याविरोधात ठाण्यातील कळव्यात आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. केतकी चितळेने यात शरद पवारांच्या आजाराविषयी वादग्रस्त पोस्ट केलीय. यावरून तिच्यावर सोशल मीडियावरून घणाघाती टीका झाली. अनेकांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी अतिशय लढाऊ बाण्याने कॅन्सरचा सामना केलाय. कॅन्सर झाला हे कळताच अनेकजण घाबरुन जातात, त्याच्याविरुद्ध न लढता या रोगाचा बळी ठरतात. अशावेळी पवारांच्या या लढ्यावर केतकी चितळेने अभद्र भाषेत केलेली टीका ही अनेकांना रुचलेली नाही. काय होता शरद पवारांचा कॅन्सर विरुध्दचा लढा ?

कॅन्सरविरुद्ध आपल्याला जिंकायचंय!

शरद पवारांना जेव्हा कॅन्सर झाल्याचं कळलं तेव्हा त्यांनी कॅन्सरविरुद्ध आपल्याला जिंकायचंय! हे पक्क केलं. हा लढाऊबाणा आईकडुन आपल्याला मिळाल्याचं शरद पवार सांगतात. त्यांना पानपराग खाण्याची सवय होती. यामुळेच त्यांना कॅन्सरची लागण झाली.

एका दिवशी त्यांच्या गालात छोटी गाठ आल्याचं लक्षात आलं , तेव्हा ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलमध्ये टेस्ट करण्यात आल्या, यात त्यांना कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. खरतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीचा काळ होता. मात्र डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं. तेव्हा ऑपरेशननंतर देखील त्यांनी प्रचारसभा घेतल्या, त्यामुळे कित्येकदा रक्त यायचं मात्र त्यांनी वेदनेला स्वत:वर वर्चस्व गाजवू दिलं नाही. तर वेदनेलाही झुकवलं.

पुढे किमोथेरपीवेळेसही त्यांना प्रचंड वेदना झाल्या, इतक्या की त्यांना पाणी देखील गिळताना भूल घ्यावी लागत होती. त्यांनी होणारा त्रास पाहुन पाषाणहृद्यी देखील गहिवरला असता, अशा स्थितीत देखील त्यांनी कामातून विश्रांती घेण्यास नकार दिला. खरतर इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी आपल्या आजारपणाला देखील नमवलंय. कर्करोग झाल्यावर त्याच्याविरोधात मनाचा निर्धार, नियमितपणानं औषधोपचार आणि कामातील एकाग्रता ही त्रिसूत्री खूप महत्वाचीय असं शरद पवार सांगतात.

आजारपणात वेदना कितीही शिगेला असतानाही त्यांनी कार्यालयात जाणं सोडलं नव्हतं.

''मी पानपराग खायचो ते पूर्णत: बंद केलं, याचे परिणाम किती भयानक आहेत हे मी अनुभवलं होतं, त्यामुळे तंबाखू आणि पानपराग खाऊ नका, असं मी आग्रहान सांगू लागलो. याचा एक विधायक परिणाम म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या सरकारनेही तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली. असं शरद पवारांनी त्यांच्या 'लोक माझा सांगाती' मध्ये म्हंटलंय.

दांडग्या इच्छाशक्तीने केली कॅन्सरवर मात-

''शरद पवारांची इच्छाशक्ती दांडगी आहे. त्यांनी आपल्या याच इच्छाशक्तीने कॅन्सरला नामोहरम केलं, याचं आपण साक्षीदार आहोत, कॅन्सरशी लढताना त्याचा अभ्यास केला आणि जगातील सगळ्यात चांगल्या उपचार असणाऱ्या ठिकाणी उपचार घेतले. आपल्या मनोबलानो त्यांनी दुखा:वर, यातनांवर मात केलं.'' कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवारांनी सकाळ डिजिटलशी बोलताना सांगितलंय.

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकांचा काळ होता. आर आर आबांनी (आर आर पाटील) कर्करोग झाल्याचं लपवलं होतं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यत्यय येऊ नये, म्हणून त्यांनी कोणालाच सांगितलं नव्हतं. तसंचं विलासराव देशमुखांना लिव्हर कॅन्सर झाला होता, पण त्यांनीदेखील आजाराकडे पूर्णत: दुर्लक्ष केलं होतं. विलासराव आणि आबा गेले तेव्हा पवार हळहळले होते. आपण त्यांना उत्तम ठिकाणी उपचाराला नेलं असतं, असं त्यांनी अनेकदा त्यांनी कार्यकर्त्याजवळ बोलून दाखवलं होतं.

कॅन्सर व्यतिरिक्त या आजारांचाही केला समाना -

शरद पवारांना २००६ मध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहीन्यात अडथळा तयार झाला होता. त्यानंतर हृद्यात स्टेंट बसवून घेण्यात आले. तर नवी दिल्लीच्या घरात पडल्यानं मांडीतल्या खुब्यातल्या बॉलला क्रॅक गेल्यावर त्याठिकाणी नवा बॉल बसवण्यात आला होता, तेव्हा काही महीने तरी काठीच्या आधाराशिवाय चालता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण १५ दिवसानंतर शरद पवार काठीच्या आधाराशिवाय चालू लागले. आजारपणात वेदना कितीही शिगेला असतानाही कार्यालयात जाणं आणि फाईल तपासणं, नियोजित भेटी, कार्यक्रमांना हजेरी लावणं सोडलं नव्हतं.

महाराष्ट्रातल्या २०१९ मधल्या विधानसभा निवडणुकीत झंझावाती

झुंझार प्रचार केला होता. आणि त्यानंतर निवडणुकीचा नूर पालटला होता.

Web Title: How Sharad Pawar Won Battle Against Cancer And Ketki Chitale Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top