जन्म दाखला कसा काढतात? इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 31 डिसेंबरपर्यंत 6 वर्षे पूर्ण आवश्यक; ‘RTE’तील 25 टक्के सोडून 75 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता

३१ डिसेंबर २०२४ रोजी सहा वर्ष पूर्ण होणारी बालके यंदा इयत्ता पहिलीत दाखल करण्यात येतील. सहा वर्ष पूर्ण असणाऱ्या बालकांना सक्ती पात्र तथा दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. ‘आरटीई’नुसार अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर असणार आहे.
zp schools
zp schoolssakal

सोलापूर : ३१ डिसेंबर २०२४ रोजी सहा वर्ष पूर्ण होणारी बालके यंदा इयत्ता पहिलीत दाखल करण्यात येतील. सहा वर्ष पूर्ण असणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र तथा दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. ‘आरटीई’नुसार अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर असणार आहे.

विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा अधिक ताण पडू नये, यासाठी केंद्र सरकारने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीतील प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता खासगी असो की शासकीय शाळांना सहा वर्षे पूर्ण नाहीत, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. कमी वयात पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीत संधी लवकर मिळते तर काहींना नोकरीची संधी इतरांच्या तुलनेत जास्त मिळते, अशीही उदाहरणे पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर आता आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देताना सर्व शाळांना १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात जन्मलेल्या मुलांनाच इयत्ता पहिलीत प्रवेश देता येणार आहे.

प्रवेशाचा वर्ग जन्मतारीख वयोमर्यादा

  • नर्सरी १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ ३ वर्षे

  • ज्युनिअर केजी १ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० ४ वर्षे

  • सिनिअर केजी १ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ ५ वर्षे

  • इयत्ता पहिली १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ ६ वर्षे

सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश

३१ डिसेंबर २०२४ पूर्वी ज्या विद्यार्थ्यास सहा वर्षे पूर्ण होतील, त्यांनाच इयत्ता पहिलीत प्रवेश मिळेल. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना तशा सूचना केल्या आहेत. तसेच ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झाली नसल्याने सर्व शाळांनी ‘आरटीई’तील २५ टक्के प्रवेश रिक्त ठेवून उर्वरित ७५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायला काहीही हरकत नाही.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

_________________________________________________________

सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता पहिलीची स्थिती

  • एकूण शाळा

  • ३३७८

  • अंदाजे प्रवेशित विद्यार्थी

  • २.२५ लाख

  • ‘आरटीई’तील शाळा

  • ३३७८

  • २५ टक्क्यांनुसार प्रवेश

  • ४४,०७७

जन्म दाखला काढायचा कसा?

बाळाचा जन्म ग्रामीण भागात झाला असल्यास संबंधित ग्रामपंचायतीत किंवा शहरात जन्म झाला असल्यास नगरपालिका किंवा महापालिकेत त्याची माहिती द्यावी लागते. अनेकदा रुग्णालयाकडूनही नावे जातात, त्याची देखील पालकांनी खात्री करावी. बाळाचा जन्म झाल्यापासून २१ दिवसांत माहिती संबंधित कार्यालयात द्यावी लागते. २१ दिवसांपेक्षा अधिक दिवस होऊनही बाळाच्या जन्माची नोंद न झाल्यास आता तहसीलदारांच्या माध्यमातून जन्मदाखला मिळतो. त्यांच्याकडे तसा अर्ज करावा लागतो आणि विलंबाचे कारणही अर्जात नमूद करावे लागते. पहिलीतील प्रवेशाला सुरवात झालेली असतानाच पालकांनी तत्काळ दाखल्यासाठी अर्ज करून तो काढून घ्यावा, अन्यथा शाळांमधील प्रवेशासाठी अडचणी येऊ शकतात.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com