मंगळवेढा तालुक्‍यातील जवानाचा श्रीनगरमध्ये कोरोनाने मृत्यू

श्रीकांत मेलगे 
Sunday, 26 July 2020

जवानाचा मृत्यू कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे झाला असल्याने त्यांचे पार्थिव हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे पाठविण्यात येणार नसल्याबाबत केंद्राय राखीव पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास कळविले असल्याचे मंगळवेढा-सांगोल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले. 

मरवडे (सोलापूर) : केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील जवानाचा कोरोनाने आज पहाटे श्रीनगर येथील दवाखान्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला. केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत असलेल्या जवानाचा कोरोनाने बळी घेतल्याने मंगळवेढा तालुक्‍यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 
केंद्रीय राखीव पोलीस दलात ते गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते. सध्या ते जवान जम्मू-काश्‍मीर येथील श्रीनगर येथे सेवा बजावत होते. सेवा बजावत असताना त्यांना शारीरिक त्रास होऊ लागल्याने सहकाऱ्यांनी उपचारासाठी दाखल केले होते. उपचरादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. 
गेल्या तीन महिन्यापूर्वी मयत जवान लॉकडाऊन काळात सुट्टीवर आले होते. सुट्टी संपताच ते गेल्याच महिन्यात परत सेवेत दाखल झाले होते. आज पहाटेच त्यांच्या मृत्यूबाबत सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून कुटूंबियांना कळविण्यात आले. जवानाच्या मृत्यूची माहिती समजताच हुलजंती गावावर शोककळा पसरली आहे. 
मृत्यू झालेल्या जवानाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हुलजंती येथील शाळेत तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण बालाजीनगर येथील माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेज येथे पूर्ण केले होते. परिस्थितीवर मात करीत केंद्रीय राखीव पोलीस दलात दाखल होत त्यांनी देशसेवेसाठी वाहून घेतले होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी व दोन मुली, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. 

दरम्यान, जवानाचा मृत्यू कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे झाला असल्याने त्यांचे पार्थिव हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे पाठविण्यात येणार नसल्याबाबत केंद्राय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास कळविले असल्याचे मंगळवेढा-सांगोला तालुक्‍याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सकाळशी बोलताना सांगितले. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी मयत जवानांच्या कुटूंबियास भेट घेऊन सांत्वन केले. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huljanti soldier death by corona in Srinagar