Vidhan Sabha 2019 : मला वादात नाही, विकासात रस : नारायण राणे 

मृणालिनी नानिवडेकर
Monday, 14 October 2019

मला वादात नव्हे तर विकासात रस आहे, कोकणात मी अनेक प्रकल्प आणले, आताही कोकणासाठी काम करत आहे. मला पुढचे पाहायचे असते, त्यासाठी मला कुणाच्याही वादात न पडता प्रगतीला चालना देणारी शांती हवी आहे.

विधानसभा 2019 

मुंबई - मला वादात नव्हे तर विकासात रस आहे, कोकणात मी अनेक प्रकल्प आणले, आताही कोकणासाठी काम करत आहे. मला पुढचे पाहायचे असते, त्यासाठी मला कुणाच्याही वादात न पडता प्रगतीला चालना देणारी शांती हवी आहे. मात्र, शिवसेना ते लक्षात घ्यायला तयार नाही, याबाबत वाईट वाटत असल्याची खंत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्‍त केली. 

कणकवलीची जागा पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत वादाचा मुद्दा बनली आहे. भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदारसंघाचा अपवाद करत शिवसेनेने तेथे मैत्रीपूर्ण लढतीत अर्ज दाखल केला. सतीश सावंत हे राणेंचे निकटचे सहकारी. ते आदल्या दिवशी माझ्यासमवेत पंक्‍तीला होते, लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाविरोधात रिंगणात दाखल झाले. राजकारणात माणुसकीच शिल्लक राहिली नाही, असे उद्‌गार राणे यांनी काढले. कॉंग्रेसने भूलथापा, खोटी आश्‍वासने देत मला प्रवेश दिला. 12 वर्षे उलटली तरी ती आश्‍वासने पूर्ण झाली नाहीत. त्यांच्याशी पटणार नाही, याची खात्री पटली. म्हणून देशात विकासाचे पर्व निर्माण करणाऱ्या भाजपला पाठिंबा दिला. शिवसेनेचे म्हणायचे तर निवडणुकीपूर्वी बोलणे ते योग्य नाही. नितेश राणे काम करतो. मतदारसंघात सतत वावरत असतो. विकासासाठी शांतता आवश्‍यक असते; पण शिवसेनेला ते मान्य नसेल, जर वादातच पडायचे असेल तर राणे उत्तर देऊ शकतात. शिवसेना सोडल्यानंतर आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटूही का दिले नाही?, असे विचारले असता ते म्हणाले की, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिलेला नाही. जो मनस्ताप झाला तो उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कमीच होता. याविषयी मी सध्या काही बोलणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i am interested in development says narayan rane