महाआघाडीत बिघाडी नको म्हणून मला सध्यातरी मुख्यमंत्री होण्याची घाई नाही - अशोक चव्हाण

बाबूराव पाटील
Saturday, 23 January 2021

पण अलीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासाठी इच्छा व्यक्त केली जात असल्याचे वृत्त आल्यानंतर सध्या तरी मुख्यमंत्री पदाची मला घाई नाही

भोकर (जिल्हा नांदेड) : कै. शंकरराव चव्हाण यांनी रचलेल्या मजबूत पायामुळे मला कळस गाठता आला. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ह पक्षांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. आता जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला कोणाचा अडसर नाही. विरोधक केवळ थापा मारत आहेत. आमचे शासन येणारे पाच वर्ष पूर्ण करेल. पण अलीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासाठी इच्छा व्यक्त केली जात असल्याचे वृत्त आल्यानंतर सध्या तरी मुख्यमंत्री पदाची मला घाई नाही असे सुचक वक्तव्य राज्याचे सार्वजनीक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर येथे शुक्रवारी (ता. २२) केले.  

नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये विकास कामांचा शुभारंभ अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलत असताना अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल आपली इच्छाच बोलून दाखवली. मला सध्या घाई नसल्याचे त्यांनी सांगितले. 

'मला कुठेही मुख्यमंत्री होण्याची घाई लागली नाही. उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. त्यांच्याबरोबर आम्ही मनापासून साथ देत आहे', असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं उत्तम काम चालू असल्याचे सांगून आघाडीत मला बिघाडी करायची नाही., असंही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

तसंच, 'आज महाविकास आघाडी सरकारमध्ये काही जण बिघाडी करण्याचे काम करत आहे. पण, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. प्रामाणिकपणे आम्ही ज्या पक्षाशी बांधिलकी बांधली आहे. सोनिया गांधी यांनी आम्हाला जो आदेश दिला आहे. त्यानुसार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शरद पवार, अजित पवार ही सर्व मंडळी भक्कमपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. पुढील पाच वर्ष महाविकास आघाडी सरकारला साथ देईल, असंही चव्हाण म्हणाले.

'हे महाविकास आघाडी सरकार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला म्हणून सरकार स्थापन झाले. या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही भाजपला रोखण्यात यशस्वी राहिलो आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राज्यात विकास कामे जी झाली आहे ती केवळ महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यामुळे झाली आहे', असे अशोक चव्हाण म्हणाले.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनीही सुद्धा दोन दिवसांपूर्वी सांगलीमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाबद्दल इच्छा बोलून दाखवली होती. पण, शरद पवार यांनी 'मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण तसे काही होणार नाही', असं म्हणत जयंत पाटलांच्या इच्छेवर पाणी फेरले आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am not in a hurry to become the Chief Minister at present as I do not want to spoil the alliance Ashok Chavan nanded pilitics news