अशीच स्थिती राहिल्यास "उजनी' भरण्यास लागतील एवढे दिवस 

संतोष सिरसट 
Thursday, 27 August 2020

उजनी धरणाची स्थिती 
उपयुक्त पाणीसाठा ः 48.34 टीएमसी 
उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ः 90.86 टक्के 
दौंड येथून येणारे पाणी ः 4975 क्‍सुसेक 
बंडगार्डन येथून येणारे पाणी ः 7821 
(सायंकाळी सहा वाजताची स्थिती) 

सोलापूर ः पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह सुद्धा कमी झाला आहे. धरणात आता दौंड येथून चार हजार 975 क्‍सुसेकने पाणी येत आहे. धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ न झाल्यास व हीच स्थिती कायम राहिल्यास धरण 100 टक्के भरण्यासाठी पुढील 10 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

पुणे जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. जर धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला तर धरण कमी कालावधीत 100 टक्के भरेल, असेही श्री. साळे यांनी सांगितले. धरणात सध्या कमी प्रमाणात पाणी येत असल्यामुळे इतक्‍यातच कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडले जाणार नाही. धरणात येणाऱ्या पाण्याची परिस्थिती पाहूनच कालव्यातून पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह असाच राहिला तर धरण 100 टक्के भरल्यानंतरच कालव्यातून पाणी सोडले जाईल. एवढे मात्र निश्‍चित झाले आहे की धरण यंदा 100 टक्के भरणार असेही श्री. साळे यांनी सांगितले. 

सोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्यासाठी हे धरण वरदान ठरल्याने त्या जिल्ह्यांचे अर्थकारण व राजकारण या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हे धरण 100 टक्के भरणे तीन जिल्ह्यांसाठी महत्वाचे आहे. मागील वर्षीचा विचार केला तर आजअखेर धरण 106 टक्के भरले होते. याशिवाय बोगद्यातून एक हजार 200 तर कालव्यातून तीन हजार 150 क्‍सुसेकने पाणी सोडणे सुरु झाले होते. मागील वर्षीची स्थिती यावर्षीही पाहायला मिळाली असती. पण, पुणे जिल्ह्यातील पाऊस कमी झाल्याने धरण 100 टक्के भरण्यास विलंब होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If this situation continues, it will take days for Ujani to be filled