विवाहापूर्वी सुखी संसाराचे बळ, नंतर का करता ‘ती’चा छळ? वाचा सुखी संसाराची‘ज्ञानेश्वरी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage
विवाहापूर्वी सुखी संसाराचे बळ, नंतर का करता ‘ती’चा छळ? वाचा सुखी संसाराची‘ज्ञानेश्वरी’

विवाहापूर्वी सुखी संसाराचे बळ, नंतर का करता ‘ती’चा छळ? वाचा सुखी संसाराची‘ज्ञानेश्वरी’

सोलापूर : सुखी संसारात ‘संशय’ व ‘मोह’ आला. ज्याने सातजन्माच्या शपथा घेतल्या तो देखील सासरच्यांची बाजू घेऊन छळ करू लागला. ज्या कुटुंबाला तिने गोकूळ मानले, त्याच घरात जीव धोक्यात आला. शेवटी तिने त्या लोकांविरुद्ध पोलिसांत धाव घेतली. सोलापूर शहर-जिल्ह्यात पावणेदोन वर्षांत कौटुंबिक छळाच्या तब्बल सव्वादोन हजारांहून अधिक तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या.

विवाहापूर्वी पतीने ‘ती’ला सुखी संसाराचे स्वप्न दाखविले, त्यामुळे माहेरही तिला परके वाटू लागले. पतीसह सासरचे सर्वजण गोडीगुलाबीने बोलत होते, काळजी घेत होते. काही महिन्यांनी विवाह झाला, माहेरील लाडकी सासरी आली. काही महिने सुखाने संसार सुरू होता. तिने मुलांचे स्वप्न पाहायला सुरवात केली. शिक्षण चांगले झाल्याने ‘ती’ जॉब करू लागली.पण, त्यांच्या सुखी संसारात ‘संशय’ व ‘मोह’ आला. ज्याने सातजन्माच्या शपथा घेतल्या तो देखील सासरच्यांची बाजू घेऊन छळ करू लागला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या कुटुंबाला तिने गोकूळ मानले, त्याच घरात जीव धोक्यात आला. शेवटी तिने त्या लोकांविरुद्ध पोलिसांत धाव घेतली. सोलापुरातील एका उच्चभ्रू सोसायटीत नुकतीच घडलेली ही घटना. दरम्यान, सोलापूर शहर-जिल्ह्यात मागील पावणेदोन वर्षांत कौटुंबिक छळाच्या तब्बल सव्वादोन हजारांहून अधिक तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून, त्यात विशेषत: ‘माहेरून पैसे आण’ व ‘विवाहात व्यवस्थित मानपान केला नाही’ अशाच जास्त तक्रारी आहेत. सुखी संसारात हुंडा व चारित्र्यावरील संशय आणि सासर-माहेरकडील माणसांची लुडबूड हीच कारणे प्रमुख ठरत आहेत.

कौटुंबिक हिंसाचार म्हणजे...

ज्या व्यक्तीला ‘ती’ने कधीकाळी स्वत:चा प्राण मानले होते, तोच काही दिवसांनी तिचा प्राण घ्यायचा प्रयत्न करतो. विवाहापूर्वी दोघे एकमेकांना समजून घेतात, पण विवाहानंतर समजूतदारपणाची जागा हिंसा घेते. तर जिवापाड प्रेम करणाऱ्या पतीला काही दिवसांतच तिचा तिरस्कार वाटू लागतो. त्यात त्याच्या आई-वडिलासह इतरांचाही सहभाग असतो. काहीही होऊ दे, कितीही संकटे येऊ दे, तुझा खंबीर आधार बनून पाठीशी असेन, असे म्हणणाराच अपत्य तथा मुलगा नाही म्हणून हिणवू लागतो. धमकावणे, त्रास देणे, दुखापत करणे, उपाशीपोटी ठेवण्याचेही प्रकार घडतात. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी किंवा छंद पूर्ण करण्यासाठी तिच्या नातेवाइकांकडे हुंडा, पैसे मागतो. स्वत:च्या मालमत्तेत तिला हक्कापासून वंचित ठेवून घराबाहेर काढले जाते. पण, पीडितेला न्याय व हक्क मागण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे.

कौटुंबिक हिंसाचार, छळाची कारणे...

 • कौटुंबिक आर्थिक परिस्थिती व पतीचे व्यसन

 • व्यवसाय, उद्योगातील अपयश आणि पैशांचा मोह

 • सात्विकता सोडून तामसी वृत्तीची जोपासना

 • सासरच्या पैशांवर डोळा, आरामदायी जगण्याची वाढलेली अपेक्षा

कायद्याने मिळेल पीडितांना हक्क व अधिकार

 • कौटुंबिक छळ झालेल्या विवाहितेला महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ व नियम २००६ नुसार न्यायालयातून मिळविता येतो हक्क व अधिकार

 • पीडित महिलेला न्याय, संरक्षण आणि तिच्या अथवा तिच्या मुलांविरुद्ध होणारा अत्याचार कायद्याद्वारे थांबवता येतो

 • स्त्रीधन, दागदागिने, कपड्यांवर ताबा मिळतो. हिंसा करणाऱ्याला संयुक्त खाते अथवा लॉकर वापरता येत नाही. पीडितेला राहत्या घरातच राहण्याचा हक्क

 • राहते घर विकण्यास प्रतिबंध करता येतो. वैद्यकीय उपचाराचा खर्च व भावनिक, शारीरिक हिंसाचाराची मिळेल नुकसान भरपाई

 • भारतीय दंड संहिता ४९८ अ कलमानुसार पोलिसांत तक्रार दाखल करता येईल. भारतीय दंड संहितेच्या कलम १२५ अंतर्गत पोटगीशिवाय अतिरिक्त पोटगी मागता येते

 • रक्ताचे नाते, लग्नसदृश संबंध (लिव्ह इन रिलेशनशिप), दत्तकविधी या कारणाने नातेसंबंध असलेल्यांविरुद्ध मागता येते दाद

 • संरक्षण अधिकारी, सेवा पुरविणाऱ्या संस्थांना तसेच पोलिस ठाणे आणि न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पीडिता तोंडी किंवा लेखी तक्रार करू शकते

कौटुंबिक छळाच्या घटना

(जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२)

 • शहरातील तक्रारी

 • १७६२

 • ग्रामीणमधील प्रकरणे

 • ५५७

 • समझोता झालेले अर्ज

 • १,४१९

 • न्यायालयीन प्रकरणे

 • २०३

सुखी संसाराची ‘ज्ञानेश्वरी’...

सुखी संसाराची राखरांगोळी का होते, याबाबत ‘ज्ञानेश्वरी’तून सांगितले आहे. ‘म्हणऊनि संशयाहुनि थोर । आणिक नाही पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥’ असे त्यात नमूद आहे. पाप, विनाशाचे प्रमुख कारण ‘संशय’आहे. त्यातून शेवट (प्राणाचा अंत) निश्चित असल्याचे म्हटले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘दुर्बुद्धी ते मना । कदा नुपजो नारायणा ।।’ म्हणजे दुर्बुद्धी कधीच मनात येऊ नये, त्यासाठी सत्संग, ध्यानधारणा करून मनःशांती मिळवावी. विनाकारण कोणीही कोणावर संशय घेऊ नये, असे आवाहन संतसाहित्यातून करण्यात आले आहे.