राज्यात पावसाचा जोर ओसरणार 

प्रतिनिधी 
Wednesday, 23 September 2020

पुढील दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात पावसाची काहीशी विश्रांती राहणार आहे. विदर्भातील अनेक भागात पावसाची उघडीप असून कडक ऊन पडल्याची स्थिती आहे.

पुणे - गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसानंतर आता जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज (ता.२३) पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस पडला. मात्र, आता या स्थितीचा प्रभाव कमी होऊ लागल्याने पुढील दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात पावसाची काहीशी विश्रांती राहणार आहे. विदर्भातील अनेक भागात पावसाची उघडीप असून कडक ऊन पडल्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाडा आणि कोकणातही काहीशी अशीच स्थिती आहे. आज नगर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर उस्मानाबाद भागात हलक्या पावसाच्या सरी पडतील. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात उद्या (गुरूवारी) पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यात काही भागात मध्यम पाऊस पडेल. विदर्भासह इतर अनेक भागात तुरळक सरी पडणार असून शुक्रवारपासून (ता.२५) राज्यातील अनेक भागात कडक उन्हासह हलक्या पावसाच्या सरी बरसतील. पुणे परिसरातही आज मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. घाट माथ्यावरही तुरळक ठिकाणी मुसळधार तर उद्यापासून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMD intensity of rainfall will decrease in the state