१८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात प्रोत्साहन अनुदान! पहिल्या टप्प्यात ४००० कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mantralay
१८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात प्रोत्साहन अनुदान! पहिल्या टप्प्यात ४००० कोटी

१८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात प्रोत्साहन अनुदान! पहिल्या टप्प्यात ४००० कोटी

सोलापूर : राज्यातील २३ लाख शेतकरी नियमित कर्जदार असून त्यांना तीन टप्प्यात प्रोत्साहन अनुदान (प्रत्येकी ५० हजार रुपये) मिळणार आहे. आठ लाख २९ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिध्द झाली असून दोन दिवसात आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना १८ ऑक्टोबरला प्रोत्साहन अनुदान रक्कम वितरीत केले जाणार आहे. परंतु, १८ जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक सुरु असल्याने तेथील जवळपास १४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये अनुदान मिळेल. सोलापूर जिल्ह्यातील ४२ हजार ६४७ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात दानेश कोटी रुपये मिळतील.

अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, अवकाळी अशा नैसर्गिक संकटात अडकलेल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांना अद्याप अनुदान मिळाले नव्हते. शिंदे-फडणवीस सरकारने आता २०१७ ते २०२० या तीन वर्षांतील कोणत्याही दोन वर्षात कर्जाची परतफेड केलेल्यांना हा लाभ दिला जाणार आहे. ही रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात ही रक्कम वितरीत केली जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास १० हजार २०० कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातून अडचणीतील जिल्हा बॅंकांचीही थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर या जिल्हा बॅंकांना सर्वाधिक रक्कम मिळणार आहे. सरकारने आता कर्जमाफीऐवजी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जवाटपावर भर देण्याचे नियोजन केले आहे. सरकारने निर्णय घेतल्यापासून राज्यातील जवळपास सात लाख शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळाले आहे.

अतिवृष्टीची संपूर्ण मदत दिवाळीपूर्वीच

यंदा बहुतेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास २१ जिल्ह्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला असून शेतकऱ्यांसाठी सरकारने चार हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक व सततचा पण ६५ मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला, पण शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनाही भरपाई दिली जात आहे. दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

प्रोत्साहनपर अनुदान तीन टप्प्यात

 • शेतकऱ्यांची पहिली यादी

 • ८.२९ लाख

 • प्रोत्साहनाचे अनुदान

 • ४,००० कोटी

 • शेतकऱ्यांची दुसरी यादी

 • १० लाख

 • प्रोत्साहनाचे अनुदान

 • ५,००० कोटी

 • शेतकऱ्यांची तिसरी यादी

 • ४.८५ लाख

 • प्रोत्साहनाचे अनुदान

 • १,२०० कोटी