अनलॉकच्या एका महिन्यात सोलापुरात वाढले 1873 कोरोनाबाधित 

प्रमोद बोडके
Saturday, 4 July 2020

पालकमंत्री अन्‌ प्रशासन फक्त घोषणाच करत राहिले 
सोलापुरातील कोरोना स्थितीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या एक महिन्याच्या कालावधीत सोलापूरचे दौरे केले आहेत. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे आठवड्यात एकदा सोलापुरात आवर्जून येतात. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीच कोरोनाबाधित झाले आहेत. पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी त्या कोरोनाबाधित व्यक्तींच्या सोबत काही काळ होते म्हणून ते दोन्ही अधिकारी सध्या होम क्वारंटाईन आहेत. सोलापुरातील कोरोना रोखण्यासाठी पॉझिटिव्हली विचार करण्याचा सल्ला अधिकारी व लोकप्रतिनिधी देत आहेत. सोलापुरातील कोरोना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने आणि कोरोनाबाधितांना उपचार घेण्यासाठी भरमसाट पैसे मोजावे लागत असल्याने सोलापुरातील स्थिती भीषण झाली आहे. 

सोलापूर : सर्वसामान्य व्यक्ती असो की सरकार. प्रत्येकाची कोरोनामुळे कोंडी झाली आहे. घरात बसावे तर रोजगार आणि व्यवसाय बुडतोय. बाहेर पडावे तर कोरोनाची लागण होते. अशा विचित्र स्थितीतून सध्या सर्वच जण जात आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन पुन: प्रारंभची घोषणा केली. 5 जूनपासून अनेक सवलतींना सुरवात झाली. 5 जून ते 4 जुलै या अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 873 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर याच कालावधीत 188 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

अनलॉक, मिशन पुन:प्रारंभ सुरू झाल्यानंतर पोलिसांपासून ते महापालिका, जिल्हा परिषद यासह सर्वच शासकीय यंत्रणा सैल पडल्या आहेत. यंत्रणा सैल पडल्या आणि तब्बल अडीच महिने घरात थांबलेले लोक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरू लागले. या सर्वांचा परिणाम म्हणजे अनलॉकच्या एका महिन्यात कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येचा उच्चांक झाला आहे. लॉकडाऊनमध्ये जेवढी संख्या वाढली नाही तेवढी संख्या अनलॉकच्या एका महिन्यात वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनाची साखळी तुटली नाही. अनलॉकमध्ये कोरोनाची साखळी दिवसेंदिवस अधिक भक्कम होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यात सोलापूरसह अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. 

सोलापुरात 12 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. 12 एप्रिल ते 4 जूनपर्यंत सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 144 एवढी होती. याच कालावधीत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या फक्त 99 होती. 4 जुलै रोजी सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 17 तर मृतांची संख्या 287 एवढी झाली आहे. (महापालिका हद्दीतील 4 जुलैची कोरोनाबाधितांची व मृतांची संख्या यामध्ये घेतली नाही) 4 जून ते 4 जुलै या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात 1 हजार 873 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृत्यूच्या संख्येत 188 ची भर पडली आहे. याच कालावधीत 1 हजार 92 जण कोरोनामुक्तही झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased in Solapur in one month of unlock 1873 corona positive person