
नागपूर : जागतिक स्तरावर सर्वात मानाचा समजला जाणारा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार यंदा तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज या तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातला नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे.
ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्त्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केलं. तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोघांनी आकाशगंगेच्या मध्यभागी असलेलं अतिविशाल कृष्णविवर अर्थात ब्लॅक होल शोधून काढलं. त्यांचं हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचं आहे त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
मागच्या वर्षी भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कॅनडामधील शास्त्रज्ञ जेम्स पीबल्स यांना देण्यात आला होता.
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने १९८३ साली एका भारतीय शास्त्रज्ञालाही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे नाव आहे सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर.
सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०–१९९५) हे एक भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते. ताऱ्यांची उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी शोधून काढले. या कामासाठी त्यांना १९८३ चे नोबेल पारितोषिक मिळाले. शिवाय त्यांना पद्मविभूषण, ब्रूस पदक, व इतर अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्वतः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्रावरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. चंद्रशेखर यांचे काका म्हणजे विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते.
डॉ. चन्द्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. १९३० साली डॉ. चन्द्रशेखर बी. एस. सी. झाल्यानंतर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पी. एच. डी. झाल्यानंतर डॉ. चन्द्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे १९३९ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे "चन्द्रशेखर मर्यादा". ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणिताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले.
डॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतातील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च असे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
अमेरिकेतच स्थायिक असलेल्या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु २१ ऑगस्ट १९९५ रोजी झाला.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.