तात्या लांडगे
सोलापूर : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसाचा परिणाम भीमा नदी खोऱ्यात दिसू लागला आहे. दौंड येथून उजनी धरणाकडे पाण्याची आवक वाढली असून सोमवारी (ता. ६) रात्री नऊ वाजता धरणात ८० हजार ९१८ क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ झाली. हा विसर्ग कायम राहिल्यास दोन-तीन दिवसांत धरण 'प्लस'मध्ये येण्याची शक्यता लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी सोमवारी सकाळी उणे २७.२३ इतकी होती. मात्र, पश्चिम घाटातील पावसामुळे भीमा नदीमार्गे पाण्याची आवक सुरू झाल्याने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली असून दिवसभरात उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी वाढली आहे. पाऊस सुरूच राहिल्याने मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंत विसर्ग एक लाख क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
दौंड बंधाऱ्यातून सुरू झालेली ही पाण्याची आवक बुधवारपर्यंत कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठा वाढू शकतो. आठ-दहा दिवस आवक अशीच राहिल्यास उजनी धरण मायनसमधून 'प्लस'मध्ये येईल. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात येत्या काळात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यासाठी दिलासादायक
गेल्या काही दिवसांपासून धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर होता. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते. शेतीसाठी पाणी उपशावर निर्बंध घालण्यात आले आणि १५ जूनपासून भीमा नदी काठावरील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला. अत्यावश्यक सेवेसाठी केवळ दोन तास वीजपुरवठा सुरू आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळी वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरण महत्त्वाचा जलस्त्रोत आहे. त्यामुळे धरणात सुरू झालेली पाण्याची आवक सर्वांसाठीच दिलासादायक मानली जात आहे.
गतवर्षी मे अखेरीस धरण प्लसमध्ये
गतवर्षी उजनी धरण २७ मे रोजी 'प्लस'मध्ये आले होते. ४५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यात ही सकारात्मक स्थिती निर्माण झाली होती. यंदा जून महिना संपला तरी पावसाचा पत्ता नव्हता. मात्र, आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे गतवर्षाच्या तुलनेत १० दिवस उशिरा का होईना उपयुक्त साठ्यात येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.