तुकडोजी महाराज क्रांतीकारी राष्ट्रसंत

राजाराम कानतोडे
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

केवळ चौथी शिकलेल्या राष्ट्रसंतांनी सुमारे 50 ग्रंथांची निर्मिती केली. अप्रकाशित वाङ्‌मयही बरेच आहे. ही ऊर्जा त्यांना कुठून मिळाली, या प्रश्‍नाचा विचार करताना त्यांच्या आयुष्याचे अनेक कंगोरे समोर येतात. वडिलांच्या हेकेखोर वृत्तीला कंटाळून ते आणि त्यांची आई मामांकडे श्रीक्षेत्र वरखेडला राहात होते. तिथे लहानपणीच त्यांना अकडोजी महाराजांचा सहवास लाभला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामजीवनाच्या प्रत्येक पैलूचा विचार ग्रामगीतेत केला आहे. देव, धर्म, वर्ण, संसार, श्रम, संपत्ती, जीवनशिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विचार मांडले आहेत. आयुष्यभर ते खेड्यापाड्यात फिरले. हा देश त्यांनी बघितला. त्यातून लोकांची दुःख दूर झाली पाहिजे, या उर्मीने ते झटत राहिले. त्याची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त....

अमरावती जिल्ह्यातील शहीद यावली नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव माणिकदेव बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट) होय. त्यांचे लहानपणीचे नाव माणिक होते. प्रतिकूल स्थितीचे अनेक चटके त्यांनी लहानपणी सहन केले. त्याबाबत त्यांनी म्हटले आहे की
माझी जन्मयात्रा ऐकताना कोणी ! हसतील मनी नवलाने !!
हीन मी जातीचा, भाट गा कुळीचा ! घरीचा मुळीचा भिकारी मी !!
घरी पिता काम करी काम शिपियाचे ! त्यावरी आमुचे पोट चाले !!
तुड्यादास म्हणे शिकलोसे जरा ! मराठी तिसरा चौथा वर्ग !!

केवळ चौथी शिकलेल्या राष्ट्रसंतांनी सुमारे 50 ग्रंथांची निर्मिती केली. अप्रकाशित वाङ्‌मयही बरेच आहे. ही ऊर्जा त्यांना कुठून मिळाली, या प्रश्‍नाचा विचार करताना त्यांच्या आयुष्याचे अनेक कंगोरे समोर येतात. वडिलांच्या हेकेखोर वृत्तीला कंटाळून ते आणि त्यांची आई मामांकडे श्रीक्षेत्र वरखेडला राहात होते. तिथे लहानपणीच त्यांना अकडोजी महाराजांचा सहवास लाभला. अकडोजींच्या निधनानंतर त्याचे मन सैरभैर झाले. त्यांनी पंढरीचा रस्ता धरला. तिथे पंढरीनाथाचे पाय बराच वेळ धरल्यामुळे बडव्यांचे फटके त्यांना खावे लागले. पंढरी ज्या पुंडलिकामुळे वसली तिचा विचार त्यांच्या मनात आला. आई-वडिलांची सेवा करण्याचे ठरवून ते तिथून परत आले. त्यानंतर त्यांनी काही दिवस शिवणकाम केले. पण मन काही रमत नव्हते. साधना करण्यासाठी त्यांनी रामटेकचे वन जवळ केले. खडतर तपश्‍चर्येनंतर अवतारी योगिरांजाकडून त्यांना कृपाप्रसाद मिळाला. साधना आणि सेवाधर्माचे आचरण करीत असताना त्यांनी भजने म्हणायला सुरवात केली. विदर्भात त्यांच्या भजनांना तुफान गर्दी होत असे. त्यावेळी लोक "बोला संत तुकडोजी महाराज की जय‘ असे म्हणायचे तेव्हा ते मात्र "सद्‌गुरू महाराज की जय‘ असा गजर करीत असत.

देशात 1930 ते 40 हा कालखंड राजकीय धामधुमीचा होता. लोकांना एकत्र आणून त्यांच्यात राष्ट्रभक्तीचे बीज पेरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात होते. राष्ट्रसंतांनी या काळात अनेक मोठे यज्ञ केले. त्यांनी 1935 मध्ये सालाबर्डीत तर 36 मध्ये ठाकुरांच्या बागेत यज्ञ करून लोकांना जागृत केले. राष्ट्रभक्तीचे बाळकडू त्यांनी वऱ्हाडाला पाजले. त्यांच्या डफली आणि खंजिरी भजनांनी अन्यायी इंग्रजी राजवटीविरुद्ध तरुणांचे रक्त सळसळायचे.
माझ्या प्रिय भारताला का हो धरला अबोला?
स्फूर्ती द्या तरुणांशी ऐसी ! उद्धरू मायभू कैसी !
जातो धर्म लयाला !!

अशा गीतांतून जनजागृतीबरोबर राष्ट्रधर्म जागविण्याचे काम त्यांनी केले. याच काळातच गांधीजी आणि राष्ट्रसंताची वर्ध्याला भेट झाली. एक महिना राष्ट्रसंत गांधीजीजवळ राहिले. तिथून परत आल्यानंतर खादी वापरायला त्यांनी सुरवात केली. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वसमाज, स्वावलंबन, स्वातंत्र्य याचे शिक्षण ते भाविकांना देत होते. त्यांच्या खंजिरी भजनांनी अनेक जण स्वातंत्र्याचे पाईक झाले. 1942 मधील आष्टी आणि चिमूर सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले. इंग्रजांच्या ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रसंतांना अटक केली. नागपूरच्या कारागृहात त्यांनी चार महिने कारावस भोगला. सुटका झाल्यानंतर दोन वर्षे वर्धा आणि चिमूर जिल्ह्यात भाषण करू नये, अशी बंदी त्यांच्यावर सरकारने घातली. त्यानंतर राष्ट्रसंतांनी धार्मिक कार्याकडे लक्ष दिले. अनेक ठिकाणी नामसप्ताह केले. गुरूदेव मासिक सुरू केले. वरखेडला संतसंमेलन भरविले. 1949 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडून 1949 मध्ये त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी मिळाली. भूदान चळवळीत विनोबा भावे यांच्याबरोबर त्यांनी काही दिवस दौरा केला. अकरा दिवसांत 11410 एकर जमीन मिळाली. जपानमध्ये 1955 मध्ये भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी डफली आणि खंजिरीच्या स्वराची आपल्या भाषणाला जोड दिली. अवघी धर्म परिषद त्याने दुमदुमून गेली. त्यावेळी 18 देशांच्या समितीचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. स्वामी विवेकानंदांच्या नंतर त्यांनाच हा मान मिळाला. त्याच वर्षी विदर्भ साहित्य संघाच्या तुमसर संमेलनात त्यांचा थोर साहित्यिक म्हणूनही गौरव करण्यात आला. याच संमेलनात आणि विदर्भात शंभर गावात एकाच वेळी त्यांच्या ग्रमगीतेचे प्रकाशन करण्यात झाले.

ग्रामगीता हा त्यांनी मराठी संस्कृतीला दिलेला अमोल ठेवा आहे. आयुष्यभर त्यांनी मानवतेची कास धरली. 
खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा !
झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा !

हा ग्रामगीतेतील विचारांचा अर्क आहे. अतिशय सुलभ अशा ओव्यांमध्ये असलेली ग्रामगीत केवळ आध्यात्मिकच नव्हे तर भौतिकदृष्ट्या सुखी होण्याचा मार्ग दाखविते.

आता त्यांचे नाव नागपूर विद्यापीठाला दिले आहे. राज्य सरकारने ग्रामस्वच्छतेची स्पर्धा त्यांच्या नावे सुरू केली आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये क्रांतिकारक बदल घडून आला आहे. देश समृद्ध करण्यासाठी, जागतिकीकरणाने लयाला चालेली खेडी सुधारण्यासाठी त्यांच्या मार्गाचे स्मरण आपल्याला करावेच लागणार आहे. 

Web Title: Information About Rashtrasant Tukdoji Maharaj