सोलापूरच्या औषध प्रशासनाची झाली चौकशी, अहवाल होणार सादर 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 2 July 2020

औषध विक्रेत्यांना या मुद्द्यांवर होती हरकत 
सोलापुरातील औषध प्रशासन औषध विक्रेत्यांना नाहक त्रास देत आहे. त्यांच्याकडून अवाजवी रकमेची मागणी करत आहे, कोरोनाच्या कालावधीत औषध प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाची परिपत्रके पाठवून देण्याचे काम केल्याचा आरोप सोलापूर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने करण्यात आला आहे. औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची व उत्पन्नाची चौकशी करण्याची मागणीही असोसिएशनने केली आहे. ​

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील औषध प्रशासनाच्या विरोधात सोलापूर केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी तीन सदस्य पथकाने केली आहे. या चौकशीचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. या अहवालावर अन्न व औषध प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे सोलापूर शहर व जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे. 
सोलापुरातील औषध प्रशासनाच्या कारभाराविरोधात सोलापूर केमिस्ट व ड्रगिस्ट

असोसिएशनच्यावतीने राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांकडे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली. औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. बी. पाटील, औषध निरीक्षक विवेक खेडकर आणि सहाय्यक आयुक्त प्रताप पवार यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने नुकताच सोलापूरचा दौरा केला आहे. 

सोलापूरच्या औषध प्रशासन कार्यालयाकडून याबाबतची असलेली कागदपत्रे, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारी या समितीने चौकशी समितीने ताब्यात घेतल्या आहेत. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही या समितीने चौकशीसाठी बोलविले होते. सोलापूरच्या औषध प्रशासनाची बाजू, असोशियनचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे, केलेल्या तक्रारी याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquiry conducted by Solapur Drug Administration, report to be submitted