घरावर बसवा सबसिडीतून सोलर पॅनेल! २५ वर्षे भरावे लागणार नाही वीजबिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरावर सोलार पॅनेल
घरावर बसवा सबसिडीतून सोलर पॅनेल! २५ वर्षे भरावे लागणार नाही वीजबिल

घरावर बसवा सबसिडीतून सोलर पॅनेल! २५ वर्षे भरावे लागणार नाही वीजबिल

सोलापूर : ग्राहकांना लागणारी वीज निर्माण करण्यासाठी शासन २० ते ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवायचे असल्यास सर्वप्रथम वापरकर्त्याने दररोज किती वीज लागते, याचा अंदाज घ्यावा. सौर पॅनेलच्या माध्यमातून वीजबिल कायमचे बंद होईल म्हणून सरकारने ‘सौर रूफटॉप’ योजना आणली आहे. सबसिडीची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंतच असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दिली.

राज्यात दिवसेंदिवस विजेचा वापर वाढू लागला आहे. शेतीला सर्वाधिक वीज लागत असल्याने केंद्र सरकारने सौरऊर्जेचा पर्याय निवडला आहे. खासगी व शासकीय जमिनी घेऊन त्यावर सौर पॅनेल उभारले जात आहेत. कोळसा, पाणी अशा समस्यांमुळे मागणीच्या प्रमाणात वीज तयार करताना अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरावर सौर पॅनेल उभारण्यासाठी देखील सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोन-तीन पंखे, एक फ्रीज, सहा-सात एलईडी लाईट्स, एक पाण्याची मोटर आणि विजेसह टीव्ही चालवत असाल तर दररोज सहा ते आठ युनिट वीज लागेल. तेवढ्या वीज निर्मितीसाठी दोन किलोवॉटचे सौर पॅनेल बसवावे लागतील. दोन किलोवॉटसाठी चार सौर पॅनेल पुरेसे असतील. देशात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे.

५० हजारांपर्यंत मिळते अनुदान

सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी, डिस्कॉम पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून घराच्या छतावर सौर पॅनेल बसवावे लागतील. त्यानंतर सबसिडीसाठी अर्ज करता येतो. रूफटॉप सोलर पॅनेल तीन किलोवॉटपर्यंत बसवले तर सरकारकडून ४० टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. दहा किलोवॉट क्षमतेच्या सोलर पॅनेलसाठी २० टक्के सबसिडी आहे. घराच्या छतावर दोन किलोवॉटचे सोलर पॅनेल लावण्यासाठी सुमारे सव्वा लाखांपर्यंत खर्च येईल. त्यासाठी सरकारकडून ४० टक्के (४८ ते ५० हजार रुपये) सबसिडी मिळते. सौर पॅनेलचे आयुष्य २५ वर्षे असते. एकदा ७२ हजार रुपये खर्च केल्यास २५ वर्षे वीजबिल भरावे लागणार नाही.

असा करता येईल अर्ज...

  • ‘सॅन्डेस’ अ‍ॅप डाउनलोड करून पहिल्यांदा राज्य, वीज वितरण कंपनी निवडून वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करावा. मोबाईल नंबर, ई-मेल टाकून लॉगइन करा. फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करावा.

  • डिस्कॉमच्या मंजुरीची प्रतीक्षा करा. मंजुरी मिळाल्यानंतर डिस्कॉम पॅनेलमधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सौर पॅनेल स्थापित करता येतो. सोलर पॅनेल बसविल्यानंतर त्याचा तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा.

  • डिस्कॉमद्वारे नेट मीटरची स्थापना आणि तपासणी केल्यानंतर ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.

  • कमिशनिंग अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि कॅन्सल चेक सबमिट करा. अनुदानाची रक्कम ३० दिवसांत जमा होईल.