परमबीर सिंग यांनी फोन टॅपिंगमध्ये नाव घेतलेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परमबीर सिंग यांनी फोन टॅपिंगमध्ये नाव घेतलेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत?

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांची गुप्तचर खात्याच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. 

परमबीर सिंग यांनी फोन टॅपिंगमध्ये नाव घेतलेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या लेटरबॉम्बनंतर राज्यकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंबानी यांच्याघराबाहेर मिळालेल्या स्फोटकांच्या गाडीपासून सुरु झालेलं प्रकरण व्हाया सचिन वाझेंकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहचलं आहे. याप्रकरणांमध्ये दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून खंडणी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच आयुक्त पदांवरुन पायउतार करण्यावरही राज्य सरकारविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत आयपीएस आधिकारी रश्मी शुक्ला यांचं नावही घेतलं आहे. रश्मी शुक्ला यांनी कॉल रेकॉर्डिंगच्या आधारावर देशमुख यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्याचा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.  

परमबीर सिंग यांचा काय आहे दावा?
सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत परमबीर सिंग यांनी अशा खुलासा केला केला आहे की गृहमंत्री अनिल देशमुख हे पोस्टिंग आणि बदल्याच्या मोबदल्यात पैसे घेत होते. ही बाब टेलिफोन इंटरसेप्शनमधून समोर आली आहे. तत्कालीन राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधातील ट्रन्सफर-पोस्टिंगमधील सर्व पुरावे आणि माहिती डीजीपी यांना दिली होती. तसेच ही बाब त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारमधील गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याही कानावर घातली होती. मात्र, तेव्हा अनिल देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होण्याऐवजी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली.  

सध्या कुठे कार्यरत आहेत रश्मी शुक्ला?
रश्मी शुक्‍ला आणि परमबीर सिंग, दोघेही १९८८ च्या बॅचचे आयपीएस आधिकारी आहेत. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.  याआधी नागरी संरक्षण विभागाच्या महासंचालक, राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त, पुण्याच्या दुसऱ्या महिला आयुक्त तसेच मुंबई पोलिस दलात त्यांनी वेगवेगळया पदांवर कर्तव्य बजाविले आहे. एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलामध्ये ओळख आहे.  रश्मी शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे..  

फडणवीस यांनी केला रश्मी शुक्ला यांचा उल्लेख - 
रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट 2020मध्ये पोस्टिंग आणि बदलीत भ्रष्टाचार होत असल्याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दिल्याचा दावा मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. रश्मी शुक्ला या अवैध फोन टॅपिंग करायच्या, असं राष्ट्रवादीनं फडणवीसांच्या दाव्याचा विरोध करताना म्हटले आहे.  

रश्मी शुक्ला यांची कारकीर्द
रश्मी शुक्ला यांना २००४ मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदक, २००५ मध्ये उत्कृष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि २०१३ मध्ये पोलीस मेडल मिळालं आहे. हैद्राबादच्या नॅशनल पोलीस अकॅडमीतून पास आउट झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र कॅडर जॉइन केलं. राज्यात विविध ठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम सुरू केलं.  

Web Title: Ips Rashmi Shukla Param Bir Singh Quotes Intelligence Commissioner Report Against

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..