

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता जिल्ह्यात हातभट्टीमुक्त गावांची मोहीम हाती घेतली आहे. याअनुषंगाने ५४ गावांमधील हातभट्टी गाळणाऱ्या १२८ ठिकाणांवर वॉच ठेवला आहे. आठवड्यातून दोन-तीनवेळा छापेमारी करून तेथील मुद्देमाल नष्ट केला जात आहे.
हातभट्टी गावात सहजपणे उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण त्याच्या आहारी गेले. त्यामुळे नवविवाहितांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले आहे. चिमुकल्यांना समजायच्यापूर्वीच त्यांच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला, अशी चिंताजनक वस्तुस्थिती अनेक गावांमध्ये आहे. दुसरीकडे दारूच्या व्यसनातून गावांमध्ये वादविवाद, भांडणे देखील वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टीमुक्त गाव अभियान राज्यभरात सुरू केले आहे. त्याची अंमलबजावणी सोलापूरचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
ग्रामीण पोलिसांच्या मदतीने अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकले जात आहेत. १ जानेवारी ते १७ ऑगस्टपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातून तब्बल ५० हजार लिटर हातभट्टी जप्त केली आहे. तसेच सहा लाख लिटर गुळमिश्रित रसायनासह चार कोटींचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू तयार होणाऱ्या ५४ गावांपैकी ११ गावे तथा तांडे दक्षिण सोलापूर तालुक्यात तर नऊ तांडे उत्तर सोलापूर तालुक्यातील आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामीण पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील जवळपास ३५ हातभट्ट्याची ठिकाणे कायमची बंद झाली आहेत. गावागावातील चित्र आता बदलू लागले आहे, पण पोलिसांनी या बाबतीत आणखी प्रामाणिक काम केल्यास निश्चितपणे गावांमधील हातभट्टी दारू कायमची बंद होईल, असा विश्वास ग्रामस्थांना आहे.
जिल्ह्यातील हातभट्टीची स्थिती
हातभट्टी गाळणारी गावे
५४
हातभट्टी दारूची ठिकाणे
१२९
दर आठवड्यातील छापे
३
विभागातील पथके
६
वार्षिक मुद्देमाल जप्त
६ कोटी
नागरिकांनी ‘या’ क्रमांकांवर तक्रार करावी
कोणत्याही गावात किंवा गावाच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करावी. त्याठिकाणी निश्चितपणे तत्काळ कारवाई होईल आणि तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.
ऑपरेशन परिवर्तनला ‘एक्साईज’ची साथ
तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गावागावांमधील किरकोळ वाद, भांडणे बंद व्हावीत, अवैध व्यवसायातील तरुणांना योग्य दिशा दाखविण्याच्या हेतूने ‘ऑपरेशन परिवर्तन’ सुरू केले. त्याचे कौतुक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. आता ग्रामीण पोलिस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) मदतीने हा उपक्रम आणखी प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.