ब्रेकिंग! समितीसमोर 'अंतिम' परीक्षेचा पेच; 'या' जिल्ह्यांमध्ये वाढतोय कोरोना 

2SPPU_Students - Copy.jpg
2SPPU_Students - Copy.jpg

सोलापूर : कोरोनामुळे निर्माण झालेला अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा तिढा सर्वोच्च न्यायालयाने सोडविला. मात्र, राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सप्टेंबरपर्यंत परीक्षा उरकणे अशक्‍य असल्याने परीक्षेचे नियोजन करताना राज्यस्तरीय समितीसमोरील पेच वाढला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. 29) राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठांतील कुलगुरुंशी चर्चा केली. परीक्षा कधीपर्यंत घेता येतील याचा अहवाल 'युजीसी'ला दिला जाणार आहे. तत्पूर्वी, डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती त्यासंदर्भात सोमवारी (ता. 31) मंत्र्यांना अहवाल देणार आहे.

सध्या राज्यातील रुग्णसंख्या साडेसात लाखांहून अधिक असून मृतांची संख्या 23 हजार 800 झाली आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दीड लाखांपर्यंत असून ठाण्यात सव्वालाखांहून अधिक, तर रायगड जिल्ह्यात 28 हजार 821, सांगलीत साडेअकरा हजार, पुण्यात पावणेदोन लाखांपर्यंत, साताऱ्यात साडेबारा हजार, जळगाव जिल्ह्यात 25 हजारांहून अधिक, सोलापुरात साडेअठरा हजार, नाशिकमध्ये 36 हजार 430 पेक्षा जास्त, नगर जिल्ह्यात 19 हजारांहून अधिक आणि नागपूरमध्ये 25 हजार रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना वर्गात बोलावून परीक्षा घेणे कठीण असल्याचे मत काही कुलगुरुंनी बैठकीत व्यक्‍त केले. दरम्यान, काही विद्यार्थी कोरोनाबाधित झाले असून काहींच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तापसदृश्‍य विद्यार्थीही असण्याची शक्‍यता आहेत. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठांकडे पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या व बेंच उपलब्ध आहेत का, कोविड केअर सेंटरसाठी इमारती गुंतल्याने दुसरा काही पर्याय करता येईल का, यादृष्टीने ठोस नियोजन करण्याच्या सूचना उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिल्या.

उच्च शिक्षणमंत्र्यांकडून कुलगुरुंची कानउघडणी
राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये दररोज सरासरी पाचशेहून अधिक रुग्ण सापडत असल्याने अशा परिस्थितीत ऑफलाइन परीक्षा घेणे, अशक्‍य आहे. तरीही काही कुलगुरु दुटप्पी भूमिका घेत असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये. त्यांच्या जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून परीक्षा कशापध्दतीने, कधीपर्यंत घेणे सोयीस्कर होईल, याची माहिती द्यावी. राज्यस्तरीय समितीच्या अहवालानंतर प्रत्येक विद्यापीठातील परीक्षांचे वेळापत्रक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा, अशा सक्‍त सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. 29) बैठकीदरम्यान दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ऑनलाइन अन्‌ ऑफलाइन दोन्ही पर्याय वापरावे लागतील
सोशल डिस्टन्सिंग ठेवून परीक्षा घ्यायची झाल्यास तीन बेंचवर एकच विद्यार्थी बसवावा लागेल. त्यामुळे परीक्षा केंद्रे, पर्यवेक्षक अपुरे पडतील. या पार्श्‍वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा आहे त्यांची ऑनलाइन, तर ज्यांना रेंजचा अडथळा आहे अथवा ऑनलाईनची साधने नाहीत, त्यांची ऑफलाइन परीक्षा घेण्यात येईल. अधिकार मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब होईल. 
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com