
Kasba Bypoll :...ती आमची संस्कृतीच नाही; पैसे वाटण्याच्या आरोपांवर गृहमंत्री फडणवीसांचं विधान
मुंबई - कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आज गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसले होते. विरोधी उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचं धंगेकरांचं म्हणणं होत. यावर राज्याचे गृहमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.
फडणवीस म्हणाले की, पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नाही. आम्ही निवडणूक पराभूत होवो किंवा जिंको आम्ही कधीही पैसे वाटत नाही.म्हणूनच लोक आम्हाला वारंवार जिंकून देतात. कसबा आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार आहोत हे लक्षात आल्यामुळे रडीचा डाव सुरू आहे. लोकांना सर्व समजतं. धंगेकर यांनी केलेलं उपोषण आचारसंहितेचं खुलं उल्लंघन केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.
शहरांचं नामांतर आमच्याच काळात झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर टीका करताना फडणवीस म्ङणाले की, काही लोकांना वाटतं सर्वकाही त्यांच्याच काळात झालं. एक तर त्यांचा काळ अडीच वर्षांचा होता. त्या अडीच वर्षात ते दाराच्या आड होते.
काही लोकांना असं वाटते की सर्व काही त्यांच्याच काळातला आहे.. त्यांचा काळ अडीच वर्षाचा होता. अडीच वर्षात सव्वा दोन वर्ष ते दाराच्या आत होते.. त्यामुळे त्यांना जे काही दोन अडीच महिने मिळाले त्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेल असे त्यांना वाटते...
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमच्या सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतला आणि त्यानुसार छत्रपती संभाजीनगर हे नाव औरंगाबादला, तर धाराशिव हे नाव उस्मानाबादला दिलं आणि प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले. ते केंद्राने मान्य केले. आम्ही नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो... कदाचित आदित्य ठाकरे असेही म्हणू शकतात की त्यांच्या सांगण्यामुळेच मोदींनी हे प्रस्ताव मान्य केले, असा टोलाही फडणवीस लगावला.