नदीजोड, सिंचन प्रकल्प गुंतवणुकीसाठी जपानने पुढे यावे : मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी आज (सोमवार) सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मुंबई : 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे यापुढील उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील नदी आणि सिंचन विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपानी कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी आज (सोमवार) सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी हिरामत्सू यांनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार आदी या वेळी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘राज्यातील 52 टक्के भूप्रदेश हा अवर्षणग्रस्त आहे. उर्वरित 48 टक्के प्रदेशात काही प्रमाणात निश्चित असा पाऊस होतो, पण या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात जाते. दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ दरवर्षी अवर्षणाला तोंड देतो. त्यामुळे समुद्रात वाहून जाणारे पाणी रोखून ते विविध मार्गांनी या अवर्षणग्रस्त भागात पोहोचविण्यासाठी नदीजोड, वॅाटर ग्रीड अशा विविध उपाय योजना राबविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असेल. यासाठी जपानमधील कंपन्यांना गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे.’
 
‘जपानने राज्यातील महत्त्वाकांक्षी अशा अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य देऊ केले आहे. त्यामध्ये मेट्रो आणि स्मार्ट सिटीज प्रकल्पांचा समावेश आहे. या योजना-प्रकल्पांतील जपानचे सहकार्य असेच कायम राहील, पण त्यापुढे जाऊन नदी जोड आणि सिंचन प्रकल्पातही जपानच्या कंपन्यांना गुंतवणूकीची संधी आहे. त्यासाठी त्यांनी पुढे यावे,’ असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
 
जपानचे राजदूत हिमामत्सू म्हणाले, ‘जपान आणि भारताचे विविध क्षेत्रातील सहकार्य हे दृढ असेच आहे. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पात उभय देश भागीदार आहेत. मेट्रो, हायस्पीड रेल्वे यांच्यासह अन्न-प्रक्रिया उद्योग,सांस्कृतिक तसेच पर्यटन अशा क्षेत्रातही जपानने सहकार्य देऊ केले आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक तसेच कृषी क्षेत्राच्या दृष्टीनेही प्रगत राज्य आहे. त्यामुळे राज्यातील सिंचन सुविधा निर्मितीतील प्रकल्पांचे महत्त्व मोठेच असेल. यासाठी मोठ्या गुंतवणूक संधी असणाऱ्या सिंचन सुविधा निर्मिती प्रकल्पातही जपानला निश्चितच स्वारस्य असेल.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japan should come forward to invest in irrigation and River linking projects says CM