यंदा जायकवाडीसाठी नगर-नाशिकमधील धरणांचे दरवाजे उघडणार नाही, हे आहे कारण

सतीश वैजापूरकर
Thursday, 6 August 2020

जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा प्रथमत जोरदार पाऊस पडतो. दररोज एक ते दीड टीमसी पाण्याची आवक सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात या धरणात तब्बल सतरा टीएमसी नवा पाणीसाठा तयार झाला.

शिर्डी ः सह्याद्रीच्या पूर्वेला पर्जन्यछायेचा प्रदेश समजल्या जाणा-या भागात यंदा अनपेक्षितपणे जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा चोपन्न टक्‍क्‍यांवर गेला आहे.

पावसाने मार्ग बदलल्याने खरीप व फळबागांचे मोठे नुकसान सुरू आहे. तथापी धरणातील पाणीसाठ्यांची परिस्थिती मात्र दिलासा देणारी ठरणार आहे. 

जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा प्रथमत जोरदार पाऊस पडतो. दररोज एक ते दीड टिमसी पाण्याची आवक सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात या धरणात तब्बल सतरा टीएमसी नवा पाणीसाठा तयार झाला.

आणखी नऊ टीएमसी पाणीसाठा वाढला की या धरणात वरच्या बाजूच्या धरणांतून पाणी सोडण्याची गरज रहाणार नाही. येत्या आठ दिवसात हा पाणीसाठा तेथे तयार होईल अशी सध्याची स्थिती आहे.

हेही वाचा - रोहित पवार का धावले मंत्री आदित्य ठाकरेंच्या मदतीला

जायकवाडी धरणात दररोज दीड टीएमसी पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे यंदा वरच्या बाजूच्या धरणांतून तिकडे पाणी सोडण्याची आवश्‍यकता भासणार नाही. भंडारदरा, मुळा, गंगापूर व दारणा या धरणात पाण्याची आवक मंदगतीने सुरू असली तरी येत्या दोन दिवसात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मान्सुचा जोर वाढेल. या धरणांत पाणीसाठ्याचा वेग देखील वाढेल. असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

भंडारदरा यंदा चार टीएमसी नव्या पाण्याची आवक व बावन्न टक्के पाणीसाठा तयार झाला. निळवंडे धरणात अडीच टीएमसी नवे पाणी आले व एकूण एक्काव्वन्न टक्के पाणीसाठा, मुळा धरणात साडेपाच टीएमसी नवे पाणी आले.

एकूण पाणीसाठा सत्तेचाळीस टक्के झाला. गंगापूर धरणात तीन टीएमसी नवे पाणी आले. एकूण पाणीसाठा एक्कावन्न टक्के झाला. दारणा धरणात पाच टीएमसी नवे पाणी आले. एकूण पाणीसाठा त्र्याहत्तर टक्के झाला.

या सर्व धरणांच्या पाणालोटक्षेत्रात पावसाने अवघ्या दोन महिन्यात वार्षिक सरासरी पूर्ण करीत आणली आहे. ब-याच ठिकाणी दररोज पाऊस होत असल्याने खरीप पिके व फळबागांचे मोठे नुकसान होते आहे. 

 

अरबी समुद्रावर मोठ्‌या प्रमाणावर पावसाच्या ढगांची दाटी झाली आहे. येत्या दोन दिवसात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल. असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तसे चित्र स्पष्टपणे दिसते आहे. तसे झाले तर सर्व धरणे आठवडाभरात भरतील. अशी सध्याची स्थिती आहे.

- उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग 

- संपादन ः अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayakwadi will not have to release water from dams in Ahmednagar, Nashik