
महाराष्ट्र तो बस झांकी है, दिल्ली अभी बाकी है !
- जयंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मंत्री, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस बावीस वर्षे पूर्ण करून, तेविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बावीस वर्षांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास आहे. मा. शरद पवार साहेबांच्या जवळपास साठ वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील ही सर्वांत मोलाची बावीस वर्षे आहेत.
पवार साहेब यांचे राजकीय आयुष्य म्हणजे आम्हाला सर्वांना स्वाभिमानाने कसं जगायचं, याची दिलेली शिकवण आहे. १९६७ मध्ये आमदार झालेल्या पवार साहेबांनी १९७७ मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तीदेखील स्वाभिमानातूनच. पुढे वेळोवेळी त्यांनी आपला हा स्वाभिमानी बाणा कायम दाखवला. ते कधीही सर्वशक्तिमान अशा दिल्लीश्वरांच्या समोर झुकले नाहीत, याला इतिहास साक्षी आहे. १९८० मध्ये जेव्हा देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये येऊन संजय गांधींच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं आवाहन केलं, तेव्हाही पवार साहेबांनी देशाच्या सर्वाधिक शक्तिमान अशा तत्कालीन नेत्यांना नम्रपणाने नकार दिला होता. त्याच रात्री त्यांचं सरकार बरखास्त झालं; पण सत्तेसाठी ते देशाच्या तत्कालीन नेत्यांना शरण गेले नाहीत. त्यांनी स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा अभिमान कायम जपला.
राष्ट्रवादीचा सुवर्णकाळ येणार
आज संपूर्ण देश आणि देशातील विविध भागांतील नेते दिल्लीच्या जोडगोळीला घाबरत आहेत. पण या जोडगोळीला पुरून उरणारा सगळ्या देशात एकच नेता आहे आणि ते म्हणजे मा. शरद पवार साहेब. महाराष्ट्रात २०१९ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जो प्रयोग झाला, त्या प्रयोगाने या देशाला मोठी दिशा दिली आहे. ‘महाराष्ट्र तो बस एक झांकी है, दिल्ली अभी बाकी है’
१९९९ मध्ये स्थापन झालेला आपला पक्ष लगेच सत्तेत आला. अर्थात, पवार साहेबांचेच चातुर्य त्याला कारणीभूत होते आणि सलग १५ वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत राहिला. त्यानंतर २०१४ ते २०१९ हा कालखंड राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला खूप काही शिकवून गेला. मागच्या १५ वर्षांत जे शिकता आलं नाही, ते त्या पाच वर्षांत पक्ष शिकला. २०१४ ते २०१९ या कालखंडात आम्हाला आमचे लोक कोण आहेत आणि परके कोण आहेत, ते कळलं. काही लोक घाबरून पळून गेले, काही लोक आमिषांच्या पायी पळून गेले. २०१९ मध्ये महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता आली. काही जणांना असे वाटेल की हा राष्ट्रवादीचा सुवर्णकाळ आहे. मात्र, पक्षाचा सुवर्णकाळ अजून यायचा आहे. आत्ताचा काळ ही त्याची पहिली पायरी आहे. ज्या दिवशी राज्याच्या एक लाख बूथवर प्रत्येकी किमान पंचवीस जणांचं मजबूत संघटन असेल, त्या दिवशी या सुवर्णकाळाची सुरुवात होईल. ज्या दिवशी पक्षाचे राज्यात चांगल्या व अधिक संख्येने आमदार व खासदार असतील, तो दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सुवर्णकाळ असेल. पक्षात चांगलं टीमवर्क झालं तर हे नक्कीच शक्य आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं उत्तम काम
आजच्या घडीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री राज्य मंत्रिमंडळात अत्यंत उत्तम काम करत आहेत. राजेश टोपे यांचा उल्लेख यामध्ये सर्वप्रथम करावा लागेल. कोरोनाच्या या महाभयानक अशा काळात राजेश टोपे यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राला सांभाळलं आहे, ते हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
गेल्या वीस वर्षांत राज्याच्या गृहनिर्माण क्षेत्रात जे काम झालं नाही, ते काम आज जितेंद्र आव्हाड करत आहेत. अल्पसंख्याक समाजासाठी आणि नवद्योजकांसाठी - तरुणांसाठी खूप चांगलं काम नवाब मलिक करत आहेत. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोरोनाकाळात कुठेही औषधांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी होऊन दिल्या नाहीत. आज राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय योजना कोणती असेल तर ती योजना म्हणजे ‘शिवभोजन थाळी’ आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची
जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे आहे. लॉकडाउनच्या काळात या योजनेचा खूप मोठा उपयोग राज्यातील गरिबांना झाला आहे.
लॉकडाउनच्या काळात एका इंग्रजी वर्तमानपत्राचे पत्रकार संपूर्ण राज्यात फिरत होते आणि त्यांनी मला ट्विटरवर सांगितलं, की शिवभोजन थाळी ही महाविकास आघाडीची सर्वांत लोकप्रिय आणि लोकोपयोगी योजना आहे. हसन मुश्रीफ हे ग्रामविकास खात्यात खूप मोलाचे काम करत आहेत. धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागात खूप चांगलं काम करत आहेत. राज्यातील दीनदलित उपेक्षितांच्या उद्धारासाठी जी पवार साहेबांनी स्वप्नं पाहिली, ती प्रत्यक्षात उतरवण्याचे काम मुंडे करत आहेत. आज राष्ट्रवादीकडे सगळ्यात महत्त्वाचं खात जर कोणतं असेल तर ते म्हणजे सहकार. या राज्याच्या ग्रामीण भागाचा जो काही विकास झाला, त्याला कारण सहकार आहे. त्या खात्याची जबाबदारी बाळासाहेब पाटील अत्यंत समर्थपणे पेलत आहेत. गृह खात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे. त्यांची शिस्त म्हणजे एखाद्या हेडमास्तरची शिस्त आहे. त्यामुळे ते खातं चांगलं चालवणारच आहेत, यात काहीही शंका नाही. राष्ट्रवादीचे सर्वच राज्यमंत्री खूप उत्तम पद्धतीने त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. मंत्रिमंडळात अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असून, संपूर्ण महाराष्ट्र ते खूप चांगल्या प्रकारे हाताळत आहेत.
सर्वच आमदारांचे उत्तम काम
कोरोनाकाळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवक शाखेने ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ हा खूप चांगला उपक्रम राबवला. राज्याला त्याची खूप मोठी मदत झाली. राष्ट्रवादीचे सर्वच आमदार आपआपल्या मतदारसंघात जमिनीवर उतरून मोलाचे काम करत आहेत. सध्याच्या घडीला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. विरोधी पक्ष सोशल मीडियावर करोडो रुपये खर्च करून, जे साध्य होत नाही, ते पक्षाचे पदाधिकारी केवळ पक्षनिष्ठेतून प्रामाणिकपणे काम करत आहेत. ट्विटर, फेसबुकवर पक्षाचे तरुण- तरुणी खूपच चांगल्या पद्धतीने पक्षाचा किल्ला लढवत असतात.
तरुणाईला संधी मिळणार
कोरोनामुळे लोकांचे खूप नुकसान झाले आहे. अनेक उद्योग, आयुष्य, संसार अक्षरशः देशोधडीला लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या सर्व लोकांच्या मागे सेवाभावी वृत्तीने उभा राहत आहे. पुढील वर्षी महापालिका निवडणुका येत आहेत. त्यात आपल्याला पूर्ण ताकदीने उतरायचे आहे. महापालिका निवडणुकांत अधिकाधिक तरुणांना संधी दिली जावी, नव्या चेहऱ्यांना पुढे आणले जावे, या मताचा मी आहे.
राज्यात सुराज्य निर्माण करणार
या राज्यातील तरुण-तरुणींनी संपूर्ण देशाचेच नव्हे, तर जगाचे वेगवेगळ्या क्षेत्रांत नेतृत्व करावे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करून, या तरुण-तरुणींना संधी निर्माण करून द्याव्यात, अशी आमची भावना आहे. २०१४ मध्ये जे लोक ‘सबका साथ - सबका विकास’ असं म्हणत होते, ते लोक फक्त मूठभर लोकांचा विकास आज करत आहेत. संपूर्ण देशाला याची जाणीव आहे. २०१९ मध्ये देशभक्तीच्या लाटेवर स्वार होऊन, ते लोक निवडणुका जिंकू शकले; मात्र २०२४ ला परिस्थिती वेगळी असणार आहे.
सर्व स्तरांवर पक्ष मजबूत करणार
देशाने सर्वांत जास्त बेरोजगारी सध्याच्या काळात अनुभवली आहे. जेव्हा जेव्हा देश संकटात आला, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा देशाच्या मदतीला धावून गेला आहे. मग अगदी पानिपतची लढाई असो, देशाचा स्वातंत्र्यसंग्राम असो, किंवा १९६२ चे भारत-चीन युद्ध असो. आजसुद्धा देश संकटात आहे. कधी नव्हे ती आज देशाला सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या आणि सर्वांना मान्य असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे, म्हणूनच २०२४ साठी देशात पवार साहेबांकडे लोक वेगळ्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. येणाऱ्या काळात आम्हाला सर्व स्तरांवर मजबूत असा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उभा करायचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!
समाजाच्या सुखासाठी कटिबद्ध
संपूर्ण देशाला छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिशा दिलेली आहे. त्यांच्या स्वप्नातील समाज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला घडवायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी जे पसायदान लिहिलं, त्यात त्यांनी सांगितलंय की, ‘जो जे वांछील तो ते लाहो'' - ज्याची जी काही इच्छा असेल, ती पूर्ण होऊ दे'' त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांना सुखी आणि संपन्न आयुष्य जगता यावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जसा आपला महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे तसाच तो विठोबा, ज्ञानोबा, तुकोबांचा देखील आहे. महाराष्ट्र ही जशी महापुरुषांची भूमी आहे तशीच ही संतांचीही भूमी आहे.