Jitendra Awhad:...तर लोकांना भूकही कमी लागतेय; अर्थमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावरून आव्हाडांचा खोचकपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra awhad on nirmala sitharaman indian rupee notes falling dollar strengthening statement

Jitendra Awhad:...तर लोकांना भूकही कमी लागतेय; अर्थमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावरून आव्हाडांचा खोचकपणा

मागच्या काही दिवसांपासून रुपयाची सातत्याने पडझड होत आहे यादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. रूपया घसरत नसून डॉलर सातत्याने मजबूत होत आहे, असे सीतारमन म्हणाल्या आहेत. निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि अमेरिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान, निर्मला सीतारमन यांनी रुपयाची पडझड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने प्रयत्न करत असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून हाल्लाबोल केला आहे. सोशल मिडीयावर देखील त्यांच्या विधानावरून ट्रोल केलं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील खोचक ट्विट करत सीतारमन यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान आव्हाडांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या विधानाचा फोटो ट्विट करत भारताच्या वैश्विक भूक निर्देशांकातील कामगिरीवर बोट ठेवलं आहे, भूक निर्देशांकात भारत मागे गेलेला नाही तर लोकांना भूक कमी लागते आहे आणि लोक कमी अन्न खात आहेत. असे लिहीले आहे.

हेही वाचा: परिस्थिती बिकट.. देशाचं पोट भरेना, भूकही भागेना

वैश्विक भूक निर्देशांकात भारत १०७ व्या स्थानी

भारत वैश्विक भूक निर्देशांकात (२०२२) १२१ देशांच्या क्रमवारीमध्ये १०७ व्या स्थानी असून देशातील कुपोषणाचे प्रमाण देखील सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. देशातील कुपोषणाचे प्रमाण हे १९.३ टक्क्यांवर पोचले आहे. वैश्विक भूक निर्देशांक हा आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील भुकेच्या प्रमाणाचे मोजमाप करण्यासाठीचा एक सर्वसमावेशक मानदंड समजला जातो. भारताचा या क्रमवारीमध्ये २०.१ अंकांसह गंभीर स्थिती असलेल्या देशांच्या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताच्या खालोखाल अफगाणिस्तानचा (१०९) क्रमांक लागतो.

भारतापेक्षाही पाकिस्तान (९९), बांगलादेश (८४), नेपाळ (८१) आणि श्रीलंकेतील (६४) स्थिती तुलनेने बरी असल्याची बाब उघड झाली असून २०२१ मध्ये ११६ देशांच्या यादीमध्ये भारत १०१ व्या स्थानी होता तर २०२० साली तो ९४ व्या स्थानी होता. दरम्यान, या अहवालात चुकीच्या पद्धतीने भूकेचे मोजमाप करण्यात आले असून, यात गंभीर संशोधनात्मक त्रुटी आहेत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Nirmala Sitharaman: रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; सीतारामन यांचं अजब विधान