" 'बिग बीं'ना जाब विचारणारे अन् मुकेश अंबानींना एकेरी हाक मारणारे कलमाडी खासच" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Kalmadi

" 'बिग बीं'ना जाब विचारणारे अन् मुकेश अंबानींना एकेरी हाक मारणारे कलमाडी खासच"

मुंबई - एकेकाळी महापालिकेवर एकहाती वर्चस्व ठेवणारे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शुक्रवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. तब्बल दहा वर्षांनंतर कलमाडी पालिकेच्या इमारतीत आले होते. कलमाडी यांच्या पालिका भेटीने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कलमाडी यांच्याविषयी जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कलमाडी यांच्या संदर्भातील एक फेसबुक पोस्ट माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. (Suresh Kalmadi news in Marathi)

या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी कलमाडी यांच्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पोस्टमध्ये म्हटल की, कित्येक वर्षांनंतर सुरेश कलमाडी यांचं आज सार्वजनिक दर्शन झालं.पुणे फेस्टिव्हलचं निमंत्रण द्यायला पुणे महापालिकेत आयुक्तांना भेटायला आलेल्या कलमाडींना पाहून धक्काच बसला.

धक्का अशा अर्थाने की, वयाच्या ऐंशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले 'हेच ...का ते कलमाडी..? 'असं म्हणत स्वतःलाच चिमटा काढावा असे त्यांना जवळून ओळखणा-यांना हमखास वाटलं असणार... पुणं म्हटलं की कलमाडी.. असं समीकरण एकेकाळी घट्ट रुजलेल्या या सांस्कृतिक राजधानीवर तब्बल साडेतीन दशके (३५ वर्ष)अधिराज्य गाजवलेली ही व्यक्ती इतकी वृद्ध झालीय, काठी घेऊन चालावं लागतंय ? हा खरोखरच त्यांना समोरासमोर पाहणऱ्यांसाठी धक्का होता. मानवी जीवनाचा उत्तरकाळ (म्हातारपण ) कोणालाच चुकलेला नाही, परंतु काही व्यक्ती अशा असतात की, त्यांनी कधी म्हातारं होऊच नये ? अशांमध्ये कलमाडी मोडत. एकेकाळचे स्टाईल आयकॉन, तरुणांचे आयडॉल असलेले आणि इव्हेंट मग तो सार्वजनिक कार्यक्रमाचा असो की राजकारणाचा... झपाटून जाणं म्हणजे काय? ते कलमाडींपासून शिकावं...! पुणे मॅरेथॉन, पुणे फेस्टिवल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल हे उपक्रम सातासमुद्रापार पोहोचलं ते कलमाडींमुळेच.... मुकेश अंबानी, टाटा, बिर्लापासून अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी आडवाणी, शरद पवार अशा दिग्गजांना ज्यांचा सहवास हवाहवासा वाटायचा असे वलय होतं कलमाडींचं एकेकाळी...! देशात.. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात.. कलमाडी... अशी दिल्लीकर राजकारण्यांमध्ये क्रेझ असलेले कलमाडी म्हणजे अफाट जनसंपर्क व ऊर्जेचा न आटणारा झरा...! आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांवर हुकुमत गाजवावी ती कलमाडींनीच.... शरद पवारांना १९९०च्या दशकात पंतप्रधान पदाच्या काठावर पोहचवण्याची कामगिरी कलमाडींच्या नावावर अजूनही शाबूत आहे. काँग्रेस हायकमांडच्या मनात पुण्यासंदर्भातील कुठलाही निर्णय घेणे असो किंवा अमुक तमुक कार्यकर्त्याला पद देणं असो, कलमाडींच्या मांडवाखालूनच हायकमांडला जावे लागायचे.

"मी जगात कुठेही असो, पुण्यातील वर्तमानपत्रे दररोज सकाळी आठ वाजता मला वाचायला मिळालीच पाहिजे" असा दंडक त्यांनी आपल्या पीएला घालून दिला होता.

असंख्य किस्से, आठवणी यांची पोतडी आज त्यांचं छायाचित्र पाहून माझ्या स्मृतीतून बाहेर येऊ लागल्या.

माणसाच्या जीवनात कधी काय होईल ? याचा नेम नाही. राष्ट्रकुल घोटाळा उघडकीस आला आणि कलमाडींना जेलमध्ये जावं लागलं, कलमाडी अस्ताला तिथूनच सुरुवात झाली. १९९० च्या दशकात पत्रकारिता करत असताना हा माणूस मला नेहमी वाचायला आवडायचा. कलमाडींच्या मुलीच्या लग्नाला पुण्यात अमरसिंह बरोबर आलेल्या अमिताभला 'लेट का आलास..? म्हणून रागावलेले कलमाडी मी विसरूच शकत नाही. तर पुण्यातील पंचतारांकित हॉटेल 'ली मेरिडियन' मध्ये एका बिझनेस कॉन्फरन्समध्ये ....मुकेश....अशी एकेरी हाक अंबानींना मारलेले कलमाडी मला विसरणे अशक्यच....

सुरेशभाईं बद्दलचे जे लिहिले आहे ते सत्यकथन आहे ..लिहिणार्याने नाव नाही टाकले खाली

खरंच खूप मोठ्या मनाचे आहेत सुरेश भाई मी अत्यंत जवळून हे बघितले आणि अनुभवले

मला साहेबां कडे पहिल्यांदा घेऊन जाणारे सुरेशभाईच

फोटो बघून नकळत डोळे पाणावले

आता अशी माणसं दुर्मीळ आहेत

वो दौर हि कुछ और था ..!!!!!

पुणे महापालिकेला दिलेल्या भेटीमुळे सुरेश कलमाडी राजकीय वर्तुळात चर्चेत आले. मागील अनेक दिवसांत ते कुठं दिसलेही नव्हते. त्यामुळे कारकिर्दीविषयी सोशल मीडियावरही चर्चा रंगल्या होत्या.

टॅग्स :CongressDr.Jitendra Awhad