प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 'ही' आहे शेवटची तारीख...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी( ३१ जुलै २०२०) असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी( ३१ जुलै २०२०) असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँक तसेच आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीच्या पुर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही. 

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढविणे केंद्र शासनाच्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशक्य असल्याने अशा स्वरुपाच्या कोणत्याही चर्चेवर विश्वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये दिनांक ३१ जुलैपर्यंत विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले आहे.

राज्यातील वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सविस्तर सुचना कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर व संबंधित विमा कंपनींना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

संपादन- सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: July is the deadline to participate in the Prime Ministers Crop Insurance Scheme