"मेघदूता'च्या प्रभावात "ऋतुसंहार' दुर्लक्षित (महाकवी कालिदास दिन)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

संस्कृतच्या अभ्यासक्रमावरही विशेषत्वाने "मेघदूत' व "शाकुंतल'चा प्रभाव दिसतो. यासोबत "ऋतुसंहार'ची चर्चा झाली आणि त्यावर अभ्यास झाला, तर अधिक चांगले होईल. 
- डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी 
माजी विभागप्रमुख 
संस्कृत विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 

नागपूर : महाकवी कालिदास म्हणजे "मेघदूत' हे एक समीकरणच झाले आहे. अतिशय दर्जेदार असे हे महाकाव्य कित्येक वर्षांपासून देश-विदेशातील साहित्यिकांना भुरळ पाडत आले आहे. नाटक, चित्रपट, नृत्यनाटिका अशा कितीतरी माध्यमांतून ते सहज सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचले. मेघदूताच्या या प्रभावात मात्र, कालिदासाचे "ऋतुसंहार' हे लघुकाव्य दुर्लक्षित राहिल्याची खंत व्यक्त होते.

 "आषाढस्य प्रथम दिवसे' महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा होतो. याचेच औचित्य साधून संस्कृतच्या अभ्यासक डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी "ऋतुसंहार'चे महत्त्व "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. "ऋतुसंहार' या लघुकाव्यात "संहार' या शब्दाचा अर्थ "नाश' असा नसून. "एकीकरण' असा होतो. मेघदूताप्रमाणे यातही ऋतूंचे वर्णन आहे अन तेही तेवढ्याच तोडीचे आहे. सौंदर्यमीमांसा आणि नायिकांची वेगवेगळी रूपं मोहित करणारी ठरतात. एखादे नृत्य नाट्य बसवावे, असा त्याचा दर्जा आहे. "ऋतुसंहार'ही "मेघदूता'एवढेच प्रसिद्ध व्हायला हवे होते. तसे झाले नाहीच, शिवाय त्याची उदाहरणेही कमी दिली जातात, असे डॉ. रूपा कुळकर्णी म्हणतात.

 महाकवी कालिदासाच्या "रघुवंशम्‌'चेही खूप कौतुक झालेले आहे. विशेषत्वाने कुठल्याही प्रसंगांना "मेघदूत' महाकाव्य आणि "अभिज्ञान शाकुंतलम्‌' या नाटकाचीच उदाहरणे दिली जातात. त्याच्यापाठोपाठ "मालविकाग्निमित्रम', "विक्रमोर्वशीयम्‌' या संस्कृत नाटकांची चर्चा होते, असेही त्या आवर्जून सांगतात. 

संस्कृतच्या अभ्यासक्रमावरही विशेषत्वाने "मेघदूत' व "शाकुंतल'चा प्रभाव दिसतो. यासोबत "ऋतुसंहार'ची चर्चा झाली आणि त्यावर अभ्यास झाला, तर अधिक चांगले होईल. 
- डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी 
माजी विभागप्रमुख 
संस्कृत विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 

Web Title: kalidas day