आली रे आली.. आता नागपूरच्या गुंडांची बारी आली!

आली रे आली.. आता नागपूरच्या गुंडांची बारी आली!

कऱ्हाड (जि. सातारा) : रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याची माहिती मिळाली की, पोलिसांचा चोप ठरलेलाच असायचा. गुंडाचे स्टेटस् ठेवले की, पोलिसांची पायरी झिजवायलाच लागायची अशा डझनहून अधिक चांगल्या कारवाईबरोबरच मोक्का, खून, चोरी आदींचे तपासही अव्वल करणाऱ्या, गुंडांमध्ये वचक निर्माण करणाऱ्या सिंघम स्टाईल पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांची वर्षातच तिसऱ्यांदा तडकाफडकी बदली झाली. त्याला राजकीय वादाची झालर असून दोन वर्षापूर्वी कोल्हापूर येथे महापौर निवडीवेळी ज्येष्ठ नेते व विद्यमान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी झालेल्या वादाचे पडघम आत्ताच्या बदली मागचे हे कारण असल्याची चर्चा पश्चिम महाराष्ट्रातील पोलिस दलात व्यक्त होत आहे. 

पोलिस उपाधीक्षक गुरव यांची कऱ्हाडला वर्षापूर्वी 22 सप्टेंबर 2019 मध्ये बदली झाली. हजर झालेल्या दिवशीच त्यांनी त्यांची भूमिका स्प्ष्ट केली. स्वागताला येणाऱ्यांचा बायोडाटा आधीच समोर ठेवत त्यांना नीट वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नवीन आहेत, बघू असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या किमान डझनभर कुख्यात गुंडांना गुरव यांनी खाकी स्टाईलने सरळ केले. रात्री-अपरात्री वाढदिवस साजरा व्हायचा, फटक्यांची आतषबाजीने सामान्य घाबरायचे, तलावरीने केक कापला जायचा या शहरासह तालुक्यात प्रथा होत्या. त्यावरही हातोडा चालवून गुरव यांनी थेट गुन्हे दाखल केले. वाढदिवस सिलेब्रेशन करणाऱ्यांच्या समाचार घेतला. 

तब्बल वीसपेक्षा जास्त गुन्हे त्याबाबत तालुक्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल आहेत. मोबाईलचे स्टेटस् जर गुंडगिरीचे असेल तर त्यालाही चोप देण्याच काम त्यांनी वर्षभरात गुरव यांना दोन मोक्काच्या कारवाया केल्या. त्याशिवाय एक स्थानबद्धतेची कारवाई झाली. ती तब्बल 14 वर्षाने झाली. ही कारवाई करतानाच गुरव यांना समाजातही स्वतंत्र ओळख निर्माण केली. कऱ्हाडची माणुसकी नावाचा ग्रुप तयार करून त्यांनी सामाजिक कार्य केले. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुक्याचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्याशी चांगला समन्वय ठेवत अत्यंत पोलिसींग राबविले. अर्थात पोलिस खात्यात ते काम करावेच लागलेत. मात्र, हटके काम केल्याने गुरव यांचा चांगलाच गवगवा झाला. पोलिस उपाधीक्षक गुरव यांची कोल्हापूर येथील कारकीर्द चांगलीच गाजली होती. 

दोन वर्षापूर्वी महापौर निवडीवेळी त्यांचा कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. हमरीतुमरीपर्यंत गेलेल्या वादाची त्यावेळी राज्याभर चर्चा झाली होती. त्यावेळी तेथून श्री. गुरव यांची तडकाफडकी चिपळूणला बदली झाली होती. तेथे वर्षभर काम करतात तोच तेथूनही त्यांची थेट कऱ्हाडला बदली झाली. कऱ्हाडमध्ये त्यावेळी स्थिती हातळण्याची कसोटी होती. भर चौकात गुंडाचा गोळ्या घालून खून झाला होता. त्याच्या तपासापासून गुंडगिरीवर पोलिसांचे नियंत्रण आणण्याची कार्यवाही त्यांनी केली. त्यामुळे त्यांचे नावही झाले. त्या चांगल्या कामाचे गिफ्ट त्यांना मिळाले. येथे येऊन वर्षभराचा कालवधी पूर्ण होतोय, त्याला चार दिवसही होत नाहीत, तोच त्यांची बदली नागपूरला सहायक पोलिस आयुक्तपदी झाली आहे. त्यामागे दोन वर्षापूर्वी झालेल्या वादाची झालर असल्याची चर्चा आहे. 

कोविड योद्धा

पोलिस उपाधीक्षक गुरव यांना कोरोनाच्या काळात येथे चांगले काम केले. गरजूंच्या मदतीपासून ते पोलिसांच्या सुरेक्षालाही त्यांनी प्राधान्य दिले. सगळ्यात पुढे होवून काम करणाऱ्या गुरव यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यासह घरतील सर्वानाच कोरोनाने ग्रासले. त्रास कमी आहे. दवाखान्यात गेलो तर बेड आडेल, ही भूमिका घेत त्यांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला. आता ते बरे झाले आहेत. मात्र,  त्यानंतर तब्बल 70 हून अधिक शासकीय कोरोना योद्धांनी त्याचे अनुकरण करत होम आयसोलेशनचा पर्याय निवडला होता.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com