
सयाजीराव महाराजांचं स्मारक म्हणून कर्मवीरांनी हायस्कूल उभारलं होतं
कर्मवीर भाऊराव पाटलांचा आज स्मृतीदिन. रयत शिक्षण संस्था... नाव ऐकलंच असेल. ऐकलंच नव्हं, आपल्यापैकी कित्येकाने रयत मधूनच शिक्षण घेतलं असेल. रयत म्हणजे प्राण होता बहुजणांचा आणि ग्रामीण जीवनाचा. ग्रामीण भागात जेव्हा शिक्षणाचा लवलेशही पोहोचला नव्हता त्यावेळी या माणसानं प्रत्येक मागास घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा या महत्वकांक्षेने स्वत:ला वाहून घेतलं अन् 'रयत' सुरू झाली.
समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी केली खरी पण शिक्षणासाठी थोडाफार पैसा लागायचाच. त्याही पैशाची अडचण होतीच ना. मग सुरू झाली कमवा आणि शिका योजना. या योजनेतून समाजातल्या सगळ्या घटकातील पोरं शिकू लागली. ती फक्त शिकतंच नव्हती तर समता व बंधुतेचेही संस्कार त्यांच्यावर होऊ लागले. साताऱ्यात सुरू झालेली रयत आता महाराष्ट्र आणि कर्नाटकात पसरलीय. पण भाऊराव पाटलांनी साताऱ्यात थेट बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने मोफत निवासी माध्यमिक विद्यालय सुरू केलं होतं.

कर्मवीर भाऊराव पाटील
विसाव्या शतकाची सुरूवात होती. भाऊराव मुळात बंडखोर होते. समाजातल्या रुढी आणि विषमतेचा त्यांना मुळात राग होता. अस्पृश्यांना पाणी दिलं जात नव्हतं म्हणून लहानपणी एकदा त्यांनी आडाचा रहाटंच मोडून काढला होता. या सगळ्या प्रकारला कंटाळून त्यांनी समाजासाठी काम करायचं ठरवलं. पुढे शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूराला जावं लागलं. तिथे त्यांची छत्रपती शाहू महाराजांची ओळख झाली आणि त्यांना गुरू मिळाला अन् सुरू झाला प्रवास. दलितांना आणि मागासवर्गीयांना शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी १९१९ मध्ये साताऱ्यातील काले गावात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर या संस्थेचे मुख्यालय साताऱ्यात नेलं गेलं. आता प्रश्न होता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा. त्यांना शहरात किंवा गावापासून एवढ्या लांब शिक्षणासाठी येणं पुरणारं नव्हतं. मग एक मार्ग सुचला. भाऊरावांनी आपल्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि सुरू झालं बहुजण विद्यार्थ्यांसाठीचं वस्तीगृह.

कर्मवीर भाऊराव पाटील
त्यानंतर भाऊराव सुसाट सुटले. बहुजणांच्या आणि ग्रामीण भागातील समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी वाहून घेतलेल्या भाऊरावांनी पुढे १९२७ मध्ये गांधींजीच्या हस्ते सुरू केलेल्या वस्तीगृहाचं 'श्री छत्रपती शाहू बोर्डिंगची हाऊस' असं नामकरण केलं. १९३५ मध्ये रयत शिक्षण संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. त्याच साली त्यांनी साताऱ्यात सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज सुरू केलं. बहुजनांच्या उद्धारासाठी त्यांचं काम पाहून बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना साताऱ्यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले आणि राज्यरोहणास साठ वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलं होतं. त्यांनी दिलेल्या देणगीतून भाऊरावांनी कमवा आणि शिका या पद्धतीने चालणाऱ्या पहिल्या 'फ्री अॅन्ड रेसिडेन्शिअल हायस्कूल'ची स्थापना केली आणि त्याला नाव दिले 'महाराजा सयाजीराव हायस्कूल'. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. पुढे १९४७ मध्ये साताऱ्यात 'छत्रपती शिवाजी कॉलेज' तर १९५४ मध्ये 'कराडला सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज'ची स्थापना केली.

कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तसं बघितलं तर बडोदा संस्थान महाराष्ट्रापासून दूर होतं. पण भाऊराव पाटलांचं आणि महाराज सयाजीराव यांचं काम सारखंच. दोघांनीही बहुजनांच्या विकासासाठी आपल्याला वाहून घेतलं होतं. अस्पृश्यता निवारण्यासाठी दोघांनीही तेवढ्याच पोटतिडकीने काम केलं होतं. सयाजीरावांनी एकदा आपल्या भाषणात "जातीचे सर्वांत मोठे परिणाम राष्ट्रीय हितावर होतात." असं म्हटलं होतं. त्यांचाही समाजातून अस्पृश्यता मुळातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न होता. त्यावरुनच गरिब आणि मागास बहुजनांना शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी भाऊरावांनी थेट बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या नावाने मोफत आणि रहिवाशी हायस्कूल सुरू केलं होतं.
समाजातील वंचित असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भाऊराव पाटील यांचं कार्य मोलाचं आहे. त्यावरुन त्यांना 'कर्मवीर' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सन १९५९ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. अशा या महान समाजसुधारकास सकाळ माध्यम समूहाचा मुजरा.
Web Title: Karmveer Bhaurao Patil Memorial Day Sayajirao Gaiakwad Maharaj Highschool
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..