
'२०२४ ला धनंजय मुंडे विरुद्ध, करुणा धनंजय मुंडे अशी लढत १०० टक्के होणार'
करुणा शर्मांची राजकारणात एन्ट्री; मुंडेंनाही देणार आव्हान
मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरणात अनेक बदल होतं आहेत. यादरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात उत्तरच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. कोल्हापूर (Kolhapur) उत्तरची पोटनिवडणूक लढवणार असून स्वत: मैदानात उतरण्याचे जाहीर केले आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी त्या म्हणाल्या, माझ्यावर अन्याय झाला तेव्हा कुणीही माझ्या पाठीशी उभारलं नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. यावर कुणीही आवाज उठवत नाहीये. एका महिन्यापूर्वी मी यासंदर्भात कोल्हापुरात पत्रकार परिषदही (Press Conference) घेतली होती. महाराष्ट्रातल्या महिलांच्या न्याय हक्कासाठी मी हा निर्णय घेतला आहे. या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कोल्हापूर उत्तरमधील (Kolhapur Election) पोटनिवडणुकीत करूणा शर्मा याच त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील. मागील काही दिवसांपासून पक्षातर्फे कोण उमेदवार असणार आहे, यावर विचार सुरू होता. जर आत्ता माझ्याकडे इतकी ताकद आहे तर मग २०२४ ला का निवडणुक लढवू शकत नाही. त्यामुळे २०२४ ला धनंजय मुंडे विरुद्ध, करुणा धनंजय मुंडे अशी लढत १०० टक्के होणार आहे, असे आव्हानच त्यांनी दिलं आहे.