क्‍लास वन कविताला "क' पदाची नोकरी 

दीपा कदम - सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

मुंबई - ओएनजीसीमध्ये एचआर विभागात क्‍लास वन अधिकारी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकारने वर्ग "क' पदाची नोकरी जाहीर केल्याने कविता निराश झाली आहे. ओएनजीसीमधील नोकरी सोडून आदिवासी विभागात काम करून आदिवासी खेळाडू घडविण्याची कविताची आस असली, तरी राज्य सरकारने मात्र लालफितीच्या कारभारानुसार तिला "क' पदाची नोकरी जाहीर केली आहे. 

मुंबई - ओएनजीसीमध्ये एचआर विभागात क्‍लास वन अधिकारी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकारने वर्ग "क' पदाची नोकरी जाहीर केल्याने कविता निराश झाली आहे. ओएनजीसीमधील नोकरी सोडून आदिवासी विभागात काम करून आदिवासी खेळाडू घडविण्याची कविताची आस असली, तरी राज्य सरकारने मात्र लालफितीच्या कारभारानुसार तिला "क' पदाची नोकरी जाहीर केली आहे. 

आश्रमशाळेत सहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कविता राऊतने आश्रमशाळेतील व्यवस्थेचे चटके सोसलेले आहेत. तिथल्या खाण्या-पिण्याची आबाळ तिच्या वाट्यालाही आलेली आहे. पण आदिवासी मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू बनण्याची विलक्षण क्षमता असल्यानेच या मुलांसाठी काम करता यावे म्हणून तिला आदिवासी विभागातच नोकरी करण्याची इच्छा आहे. कविताने "सकाळ'शी बोलताना सांगितले, "नोकरीच करायची तर आताही मी ओएनजीसीमध्ये वर्ग 1 पदावर काम करतेच आहे. राज्य सरकारपेक्षा तिथली वेतन श्रेणी पण खूप वरची आहे. पण ज्या मातीतून मी आले तिथल्या मातीतच मला काम करायचे आहे. जे यश माझ्या वाट्याला आले तसेच यश इतर आदिवासी मुलांनाही पाहता यावे यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. राज्य शासनाच्या इतर कुठल्या विभागात नव्हे तर आदिवासी विभागातच काम करण्याचीच इच्छा असल्याचेही कविताने स्पष्ट केले. 

या वर्षीच झालेल्या ऑलिंपिकमध्येही कविताचा सहभाग होता. त्यापूर्वी झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्ण, आशियाई चॅंपियनशिपमध्ये रौप्य आणि ब्रॉंझ, 2011च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण अशी अनेक पदक नावावर असतानाही कविताला "क' वर्गाची नोकरी सरकारने जाहीर केल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. 

आदिवासी विकासमंत्रीही नाराज 

यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ललिता बाबर या धावपटूला क्‍लास वन पदाची नोकरी जाहीर केली आहे. ललिता आणि कविताचे शिक्षणही सारखेच आहे. पदांच्या कमाईत कविताचे पारडे थोडसे जड आहे. मात्र कविताला वर्ग "क' पद जाहीर झाल्याने आदिवासी विकास मंत्रीही नाराज झाले. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमच्या मुलीला वर्ग "क' पदाची नोकरी का, असा सवाल करत तिच्यावर झालेला अन्याय दूर केला जावा, अशी शिफारस केली. विशेष म्हणजे कविताला क्रीडा विभागात नोकरी करायची नसून आदिवासी मुलांसाठी काम करता यावे म्हणून आदिवासी विभागातच नोकरी करायची असल्याचे तिने स्पष्ट केले.

Web Title: kavita raut was disappointed public office job