"कोरोना'तील खाबुगिरी : सोलापूरच्या पीपीई किटस्‌ला सरकार मुरडतयं नाक

प्रमोद बोडके
Saturday, 19 September 2020

  • सोलापूरच्या पीपीई किटस्‌ची वैशिष्ट्ये 
  • डिस्पोजेबल, बीआय, लॅमिनेटेड/ट्राय लॅमिनेटेड नॉन ओव्हन कापडापासून बनलेले सूट 
  • हेडगिअर, थ्री प्लाय फेस मास्क, हॅंडगोव्ह्ज, बायो हझर्ड बॅग्ज, शू कव्हर 
  • स्टिचिंगवर तीन एमएमचा टेप लावल्याने सूक्ष्म जंतु संसर्गापासून बचाव 
  • 100 टक्के पॉलिस्टर 60 जीएसएम वॉटर प्रूफ टफेटा फॅब्रिकपासून बनलेले 
  • पोलिस, आशा, अंगणवाडी सेविकांसाठी उपयुक्त 

सोलापूर : कोरोनाचे संकट नवखे असताना सोलापुरातील गारमेंट व्यावसायिकांनी स्वत:मध्ये बदल करुन पीपीई किटस्‌ची निर्मिती सुरु केली. राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून पीपीई किटस्‌साठी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जाती. सोलापुरातील गारमेंट व्यावसायिकांनी तयार केलेली पीपीई किट किमान महाराष्ट्रातील रुग्णालयापुरती जरी वापरली तरीही सोलापूरच्या पीपीई किटस्‌ निर्मितीला मोठा हातभार लागणार आहे.

कोरोनाचे संकट कधी संपणार? या प्रश्‍नाचे ठोस उत्तर सध्या तरी कोणाकडेही नाही. जोपर्यंत कोरोनाचे संकट आहे तो पर्यंत पीपीई किटस्‌ची मागणी राहणारच आहे. सोलापुरातील गारमेंट व्यावसायिकांनी तयार केलेली पीपीई किट शासकिय पातळीवरुन खरेदी करण्यासाठी महाविकास आघाडीतील सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखविण्याची नितांत आवश्‍यकता आहे. महाराष्ट्रातील सोलापुरात तयार होणाऱ्या पीपीई किटस्‌चा मदतीचा हातभार लावल्यास अनेकांना रोजीरोटी येत्या काळातही टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे. 

कोरोनाच्या लढाईत आवश्‍यक असलेल्या साहित्य खरेदीत खाबुगिरी सुरु झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गुणवत्ता असूनही सोलापुरात तयार होणाऱ्या पीपीई किटस्‌चा दलालांच्या सुळसुळाटात टिकाव लागताना दिसत नाही. सोलापुरात तयार होणाऱ्या किटस्‌ला किमान महाराष्ट्रा पुरती, सोलापूर शहर व जिल्ह्यापुरती बाजारपेठ हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकारमधील मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे.

गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या सोलापूरने अलिकडच्या काळात शालेय गणवेश निर्मितीतून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर सोलापूरची नवी ओळख तयार केली. शाळा कधीच बंद पडू शकत नाहीत म्हणून या व्यवसायाने सोलापुरात स्थिरता मिळविली. गिरण्या बंद पडल्याने रोजगार गमावलेल्या सोलापूरकरांसमोर लॉकडाऊनने पुन्हा संकट आणले. ऐनवेळी गणवेश निर्मितीचे काम ठप्प झाले. आलेल्या संकटासोबत सोलापुरातील गारमेंट उद्योजक खंबीरपणे लढले. संकटातील संधी शोधत सोलापुरात पीपीई किट, मास्क व हॅण्ड ग्लोज निर्मितीला सुरुवात केली. कोरोनामुळे इतर ठिकाणचे रोजगार जात असताना सोलापुरातील पाच ते साडेपाच हजार जणांचा रोजगार मात्र कायम राहिला. 

सोलापुरातील गारमेंट व्यावसायिकांनी शालेय गणवेश निर्मितीच्या माध्यमातून सोलापुरातील पाच ते साडेपाच हजार कामगारांच्या हाताला काम दिले आहे. जूनपासून सुरु होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षासाठी गणवेश तयार करण्याचे काम जानेवारीपासूनच सुरु होते. यंदाही गणवेश निर्मितीचे काम जोमात सुरु झाले. मार्चमध्ये आलेल्या कोरोनाच्या संकटाने मात्र मिळालेल्या ऑर्डर आयत्यावेळी स्थगित झाल्या. सोलापुरात असलेल्या जवळपास 500 गारमेंट युनिट आहेत.

त्यातील जवळपास 15 युनिटने गारमेंट असोसिएशच्या माध्यमातून मफतलाल फॅब्रिक्‍सच्या सहकार्याने पीपीई किटस्‌ची निर्मिती केली. कोरोनाचे संकट ज्यावेळी सर्वांसाठी नवीन होते त्यावेळी व्यावसायिक बदल करत सोलापुरातील गारमेंट उद्योजकांनी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पीपीई किटस्‌ची निर्मिती सुरु केली. सोलापुरात आतापर्यंत जवळपास एक लाख पीपीई किटस्‌ची निर्मिती करण्यात आल्याची माहिती आयसोलेटेड गारमेंट क्‍लस्टरचे चेअरमन जितेंद्र डाकलिया यांनी दिली. सोलापुरात जवळपास चार ते साडेचार लाख मास्कची निर्मिती करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khabugiri in 'Corona': Govt neglate on PPE kits in Solapur