
सेवाग्राम आश्रमाचीच खादी अप्रमाणित!
वर्धा : महात्मा गांधींनी दिलेल्या स्वावलंबनाच्या शिकवणीतून सेवाग्राम आश्रमात खादी निर्मितीचे काम सुरू झाले. त्या काळात सेवाग्राम आश्रमातून ऐतिहासिक गांधी टोपीच्या माध्यमातून खादीला वेगळीच ओळख निर्माण झाली. खादीला देशपातळीवर ओळख देणारी सेवाग्राम आश्रमातील खादी मात्र अप्रमाणित असल्याचा ठपका खादी व ग्रामोद्योग आयोगाने ठेवत विक्री थांबविण्याचे पत्र पाठविले आहे.
मात्र, आयोगाने पाठविलेल्या पत्राला आश्रम प्रतिष्ठान जुमानत नाही. त्यांना जी कारवाई करायची आहे त्यांनी ती करावी, अशी भूमिका आश्रम प्रतिष्ठानने घेत खादी विक्री सुरू ठेवली आहे. शिवाय खादी आयोगाने अमलात आणलेला २०१२ चा कायदा अमान्य असल्याचे आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले. आयोगाच्या पत्राला येथे कुठलाही थारा देण्यात येणार नसल्याचा पत्रव्यवहार आश्रमातर्फे करण्यात आल्याने आता आयोगाकडून यावर काय कारवाई होते, याकडे गांधीवाद्यांचे लक्ष आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी वर्ध्याच्या दौऱ्यात स्वावलंबनाचे धडे दिले होते. यातून येथे कातण्यात आलेल्या सुतापासून खादी तयार करण्याची प्रथा सुरू झाली. या खादीने खऱ्या अर्थाने खादीला ओळख मिळवून दिली तर येथील चरखा देशपातळीवर ओळखीचा ठरला. असे असताना गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या दुसऱ्याच वर्षी खादी आयोगाकडून सेवाग्राम आश्रमातील खादी अप्रमाणित ठरविण्याचा आततायीपणा करण्यात आला आहे. त्यांचा हा आततायीपणा गांधीवाद्यांच्या जिव्हारी बसला असून त्यांनी आयोगाच्या पत्राला केराची टोपली दाखवीत होणाऱ्या कारवाईचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे.
मोठ्या नेत्यांची पसंती
महात्मा गांधी, कस्तुरबा, सरहद गांधी, अब्दुल गफ्फार खान, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महादेवभाई देसाई, डॉ. सुशीला नायर यांच्यासह अनेकांनी येथे तयार झालेली खादी परिधान केली आहे. त्याकाळात ही खादी अप्रमाणित असल्याचा कुठलाही विचार झाला नाही. मग आताच हा मुद्दा कसा प्रश्न आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने विचारण्यात आला आहे.
सेवाग्राम आश्रमात तयार होणाऱ्या खादीवर निर्णय घेण्याचा अधिकार खादी आयोगाला नाही. खादी आयोग निर्माण होण्यापूर्वीपासून येथे खादीची निर्मिती होते. यामुळे आयोगाचा कायदा आम्हाला मंजूर नाही. त्यांनी विक्री बंद करण्याचे पत्र पाठविले आहे. तरीही विक्री सुरूच आहे. संभाव्य कारवाईचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत.
- पी.आर.एन. प्रभू अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ष्ठान, सेवाग्राम, वर्धा
Web Title: Khadi Production Started At Sevagram Ashram Khadi And Village Industries Commission Sent Letter To Stop The Sale
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..