अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

विजापूरला जाऊन येतो म्हणून गेलेले पती दोन दिवसांपासून घरी आले नाहीत. त्यांना कोणीतरी पळवून नेले असून ते लोक ५० लाख रुपयांची खंडणी मागत असल्याची फिर्याद निकिता सूरज राठोड यांनी २६ मार्च रोजी मंद्रुप पोलिसांत दिली. स्थानिक पोलिसांनी शोध सुरू केला, पण संशयित आरोपी सापडत नव्हते.
Solapur Crime
Solapur Crimeesakal
Updated on

सोलापूर : विजापूरला जाऊन येतो म्हणून गेलेले पती दोन दिवसांपासून घरी आले नाहीत. त्यांना कोणीतरी पळवून नेले असून ते लोक ५० लाख रुपयांची खंडणी मागत असल्याची फिर्याद निकिता सूरज राठोड यांनी २६ मार्च रोजी मंद्रुप पोलिसांत दिली. स्थानिक पोलिसांनी शोध सुरू केला, पण संशयित आरोपी सापडत नव्हते. पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्ह्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविली आणि पथकाने १४ तासांतच संशयित आरोपींना जेरबंद केले.

सूरज राठोड (वय ३०, रा. मंद्रुप) हा २४ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास चारचाकीतून विजापूर गेलेला पती आला नसल्याने त्याच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली होती. तेव्हा सूरजचे वडील अर्जुन राठोड यांना कोणीतरी सुरजच्याच मोबाईलवरून कॉल करून ५० लाखांची खंडणी मागितली होती. ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, ५० लाख रुपये द्या, पोलिसांत गेला तर त्याला ठार मारू’ अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली होती. घाबरलेल्या अर्जुन राठोड यांनी काही वेळातच २२ ते २५ लाख रुपये जमवले. बाकीच्या पैशांसाठी त्यांनी लातूरमधील नातेवाईकास फोन केला. ते लातूर जिल्हा परिषदेतील सदस्य आहेत. त्यांनी तातडीने पैशांची गरज का पडली, याची चौकशी केली. त्यावेळी सूरजच्या वडिलांनी त्यांना हकीकत सांगितली. त्यावेळी त्यांनी थेट पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना कॉल केला आणि अधीक्षकांनी तातडीने संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. तत्पूर्वी, सूरजचे वडील संशयित आरोपींच्या संपर्कात होते, पैसे घेऊन येत असल्याचे ते सांगत होते.

संशयित आरोपी त्यांना पैशांचे फोटो पाठवायला सांगत होते. याचवेळी पथकाने कलबुर्गी परिसरातून गोपाळ मल्लाप्पा जवळगी (वय ३०, रा. वत्याळ, ता. सिंदगी, विजापूर), राघवेंद्र यल्लप्पा जवर्गीकर (वय २७), भवानीराज अरविंद गोडबोले (वय २९, दोघेही रा. बसवनगर, कलबुर्गी) यांना शोधून काढले. तिघेही आता कोठडीत आहेत. मंद्रुप पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

पोलिसांची चलाखी अन्‌ मुख्य सूत्रधार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राज डांगे, ख्वाजा मुजावर, सहायक पोलिस उपनिरीक्षक परशुराम शिंदे, नारायण गोलेकर, पोलिस हवालदार मोहन मनसावाले, संदीप काळे, सागर चव्हाण, अक्षय डोंगरे, चालक बुरुकुल यांचे पथक सूरज राठोड याच्या शोधासाठी रवाना झाले. संशयितांच्या मोबाईल लोकेशनवरून पोलिस कलबुर्गीत पोचले. सूरजला घेऊन एका लॉजमध्ये थांबलेल्या दोघांना पोलिसांनी पकडले.

चहा प्यायला थांबला अन् पकडला गेला

राघवेंद्रच्या मोबाईलवरून मुख्य सूत्रधार गोपाळला कॉल करून सूरजचे वडील पैसे घेऊन येत असल्याचे सांगायला लावले. सूरजची गाडी घेऊन गोपाळकडे होती. तो पैसे घेण्यासाठी कलबुर्गीकडे रवाना झाला. पण, त्याला संशय आल्याने तो वाटेत एकाच ठिकाणी दोन तास थांबून राहिला. पोलिस त्याच्या मागावर होते, पण गोपाळ गाडी सुरूच ठेवून आत थांबल्याने पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही. काही तासांनी गोपाळ पुढे निघाला आणि कलबुर्गीपासून सात-आठ किलोमीटरवरील ढाब्यावर चहा पिण्यासाठी थांबला. त्यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com