किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर आरोप केलेलं प्रकरण आहे काय?

1978 साली कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यात आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याची स्थापना झाली होती.
Kirit Somaiya-Hassan Mushrif
Kirit Somaiya-Hassan Mushrifesakal

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारच्या नेत्यांवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. एकीकडे संपूर्ण देश बाप्पाच्या विसर्जनात व्यग्र असताना भाजपची अंतर्गत खलबतं राज्य सरकारला पुन्हा जेरीस आणायला भाग पाडतील, अशी अपेक्षा उराशी बाळगून किरीट सोमय्यांना कोल्हापूरच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले.

अनिल देशमुख, अजित पवार, अनिल परब, प्रताप सरनाईक, रश्मी ठाकरे, मिलिंद नार्वेकर, यांच्यानंतर आता हसन मुश्रीफ सोमय्यांच्या टार्गेटवर आहेत. कोल्हापूरच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात १०० कोटींची अफरातफर झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. त्याला भाजपच्या गोटातून अनुमोदन मिळालं. त्यातच राज्याच्या पोलिसांनी सोमय्यांना नोटीस बजावली, आणि यामधून आता राजकारणाने नवं वळण घेतलं आहे. नारायण राणेंच्या प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता सोमय्या यांना ताब्यात घेतलं जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रकरणावर हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेतल्याने दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू झालं आहे.

पण विद्यमान खासदार असतानाही लोकसभेसाठी तिकीट डावललेल्या, भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात आधीपेक्षा गती मंदावलेल्या, राज्यातील भाजप नेत्यांच्या पहिल्या फळीतही न येणाऱ्या एका नेत्याला अशा पद्धतीने डोक्यावर घेणं, हे भाजपच्या राजकीय अपरिहार्यतेचं द्योतक म्हणावं लागेल. मात्र यामुळे सोमय्या यांच्या पक्षांतर्गत पुनर्वसनाची शक्यता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्र आणि त्याला समांतर चालणारं पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण येणाऱ्या काळात कोणता रंग घेतं, हे पाहाणं महत्वाचं असणार आहे.

फक्त ११ महिन्यात सुरू झालेला साखर कारखाना

1978 साली कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यात आप्पासाहेब नलावडे कारखान्याची स्थापना झाली होती. राज्यात सहकार चळवळीच्या अंतर्गत साखर कारखान्यांचे जाळे पसरत होते. यावेळी केवळ 11 महिन्यात सुरू झालेला हा एकमेव कारखाना होता. मात्र 1990 नंतर कारखान्याला उतरती कळा लागली. त्यावेळी कारखान्यावर 50 कोटींहून अधिकच कर्ज झालं होतं.

कारखाना पुन्हा व्यवस्थित सुरू होण्यासाठी एका सहकारी संस्थेला चालवायला द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र हा कारखाना एका ब्रिक्स नावाच्या खासगी कंपनीला चालवायला दिला. या कंपनीचे मालक हसन मुश्रीफ यांचे जावई असल्याचा आरोप होतोय.

हसन मुश्रीफ यांनी साखर कारखान्याला उतरती कळा लागल्यानंतर शेतकऱ्यांना आवाहन करून पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना शेअर्स विकत घेण्याचं आवाहन केलं. त्यावेळी दोन दिवसात १७ कोटी रुपये उभे राहिल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं होतं. मात्र हा साखर कारखाना, याच्याशी संबंधित आरोपांबद्दल माझा आणि कुटुंबीयांचा काहीही संबंध नसल्याचे मुश्रीफांनी आता सांगितले आहे.

Kirit Somaiya-Hassan Mushrif
भ्रष्टाचाराविरोधात मोठ्या लढाईची सुरुवात झाली - किरीट सोमय्या

काय आहे आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना घोटाळा?

कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिलिंग न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा.लि. या कंपनीला 2020 साली देण्यात आला. साखर कारखाना चालवायाचा या कंपनीला अनुभव नाही. पण या कंपनीला हा कारखाना का दिला, हे शरद पवारांना माहिती आहे, असे सोमय्या म्हणाले.

मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई असून या बेनामी ब्रिक्स इंडियाचे मालक आहेत. या कंपनीत 7 हजार 185 एस.यू. कॉर्पोरेशन प्रायव्हेट, 998 मतीन हसीनचे, तर 998 गुलाम हुसेन यांचे शेअर आहेत. म्हणजे 98 टक्के शेअर एस.यू.कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे आहेत, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिलीय.

2019 मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो या साखर कारखान्याच्या मार्फत पचवल्याचा आरोप आता भाजपने केला आहे. कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

Kirit Somaiya-Hassan Mushrif
आरोपांच्या पार्श्वभूमीवर 'सह्याद्री' आणि 'वर्षा'वर होणार महत्त्वाच्या बैठका

"हिंमत है तो रोको मुझे"

महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला जाणार असल्याची घोषणा किरीट सोमय्या यांनी केली. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात त्यांचे जंगी स्वागतही केले. मात्र कराडमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू केली. यावेळी पत्रकार परिषद घेत, मुश्रीफ यांच्याशी संबंधित सर्व साखर कारखान्यांना भेट देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याचसोबत अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यांवर ज्या साखर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत, त्या जरंडेश्वर साखर कारखान्याला देखील भेट देणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित १९ बंगल्यांना भेट देणार असल्याचे ते म्हणाले. पारनेरसह पश्चिम महाराष्ट्रातील भ्रष्टाचार करण्यात आलेल्या सगळ्या कारखान्यांचा पोलखोल करणार असल्याचं सोमय्या म्हणाले. "असेल हिंमत, तर आडवून दाखवा," असं आव्हान सोमय्यांनी ठाकरे सरकारला केलंय.

किरीट सोमय्या विरोधकांचा ओपनिंग बॅट्समन?

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाचे किरीट सोमय्या यांनी विविध मार्गांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. सोमय्या त्यांच्याकडील पुरावे ईडी, आयकर विभाग, पोलिसी यंत्रणा, लाचलुचपत प्रतिबंध विभाग,इ. सरकारी संस्थांना देण्याआधी आणि या कागदपत्रांची सरकारी यंत्रणेकडून शहानिशा होण्याआधीच ते माध्यमांपुढे आणतात. यामुळे आपसुकच कॉन्ट्रोव्हर्सी तयार होते. अशा कागदपत्रांच्या आधारे सोमय्या सरकारवर आरोप करतात. याला भाजपचे अन्य नेते समर्थन देतात. त्यामुळे या कॉन्ट्रोव्हर्सीत भर पडते. त्यामुळे सध्या किरीट सोमय्या हे भाजपचे ओपनिंग बॅट्समन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उद्धव ठाकरे गादीवर बसल्यापासून सोमय्या यांनी राज्य सरकारमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केल्याचं चित्र आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर सोमय्यांनी मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषदा घेऊन त्यांच्याविरोधात पुरावे सादर केले. याचसोबत मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. संजय राऊत यांच्या पत्नी, परिवहन मंत्री अनिल परब, प्रताप सरनाईक,खासदार भावना गवळी, हसन मुश्रीफ, अजित पवार हे सर्वजण कायम सोमय्यांच्या रडावर होते, किंबहुना अद्याप आहेत.

मात्र, एकेकाळी नारायण राणे, कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप करणारे सोमय्या या दोन नावांबद्दल मौन बाळगतात.

इन्कम टॅक्स ऑफिसची आणखी एक केस

साखर कारखान्यावर याआधी सुद्धा केसेस झाल्या होत्या. यामध्ये आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना विरुद्ध असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, सर्कल १ कोल्हापूर याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे. अतिरिक्त दराने शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेतल्याचा प्रश्न ट्रिब्यूनलने उपस्थित केला होता.

या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा अधिक दर दिल्याने इन्कम टॅक्सने काही प्रश्न उपस्थित केले होते. एकेकाळी डबघाईला आलेला साखर कारखाना शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देऊन ऊस विकत घेत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. या प्रकरणात कारखान्याला झालेल्या नफ्याची किंमत शेतकऱ्यांमध्ये वाटण्यात आल्यासंदर्भात काही उल्लेख आहेत.

सोमय्यांवरून महाविकास आघाडीत मतभेद?

सोमय्या यांना कराड पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी पुणे आणि सातारा पोलिसांनी एकत्र येत कारवाई केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मुंबईतील मुलूंडमध्ये सुद्धा काल (दि१९सप्टेंबर) किरीट सोमय्यांच्या निवासस्थानी पोलीस पोहोचले होते. यावेळी त्यांना घरातून बाहेर पडता येणार नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा सोमय्यांच्या निवासस्थानी होता.

सोमय्यांवर झालेल्या पोलीस कारवाईविषयी सेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसल्याचे संकेत त्यांच्या बोलण्यातून मिळाले. त्यामुळे ही कारवाई राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांना वाचवण्यासाठी करण्यात आली का, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला. एकत्र सरकार चालवताना राष्ट्रवादीचे गृहमंत्री काय निर्णय घेतात, याची मुख्यमंत्र्यांना माहिती नसते का, असा प्रश्न उपस्थित होतो.

"येत्या दोन दिवसांत आणखी दोन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार"

या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे पैसे खाताना लपवण्याचं कौशल्य नाही, असे पाटील म्हणाले. तसेच कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कोल्हापुरी चपलेनं नको, असंही त्यांनी म्हटलंय. चंद्रकांत पाटील यांच्याकडे कायमच कोल्हापूरची सूत्र होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पक्षाने पुण्यातील कोथरुड मतदारसंघ देऊन विधानसभेवर पाठवलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com