Laxmanrao Kirloskar : "कॅडबरी', "नॅशनल कॅश रजिस्टर'सारखी रचना होती नजरेसमोर... त्यातूनच आली किर्लोस्करवाडी जन्माला 

Kirloskarwadi
KirloskarwadiSakal

सोलापूर : भारतीय उद्योगव्यवसायांच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध कारखानदार घराणे म्हणजे किर्लोस्कर घराणे. किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक, गुर्लहोसूर येथे जन्मलेले लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर हे आहेत. त्यांनी अठराव्या वर्षी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचा अभ्यास पूर्ण केला.

पुढे व्हिक्‍टोरिया ज्युबिली टेक्‍निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम चित्रकला शिक्षक होते. नंतर बाष्प-अभियांत्रिकीचे अध्यापक. 1897 मध्ये ते मुंबई सोडून बेळगावला आले. थोरल्या भावाच्या मदतीने त्यांनी सायकल, पवनचक्की, कडबा कापणीयंत्र, लोखंडी नांगर आदी वस्तूंच्या उत्पादनास प्रारंभ केला.

1910 मध्ये औंध संस्थानाधिपतींकडून सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्याने लक्ष्मणरावांनी कुंडलच्या निर्मनुष्य व निर्जल माळावर "किर्लोस्कर ब्रदर्स' हा कारखाना उभारला व किर्लोस्करवाडीच्या वसाहतीस प्रारंभ केला. 

या कारखान्यातून लोखंडी नांगर, चरक, मोटा, रहाट वगैरे कृषी अवजारांचे उत्पादन सुरू झाले. भांडवल वाढविण्यासाठी 1920 मध्ये कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर झाले. या कारखान्यातून विविध प्रकारचे हातपंप, लहानमोठे यांत्रिक पंप, घरगुती लोखंडी फर्निचर, लेथ आदींचे उत्पादन होऊ लागले. 1934-38 मध्ये लक्ष्मणराव औंध संस्थानचे दिवाण होते. 1945 मध्ये ते कारखान्याच्या संचालकपदावरून निवृत्त झाले. 1953 मध्ये प्रथमच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे सन्माननीय सदस्यत्व त्यांना देण्यात आले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचे पुणे येथे निधन झाले. 

कारखान्याचे स्वत:चे मासिक असावे ही आधुनिक कल्पना 
औद्योगिक कारखाने चालविण्याचे व्यावसायिक शिक्षण घेतलेले नसताही लक्ष्मणरावांनी सर्व गोष्टी अतिशय परिश्रमाने साध्य केल्या. त्यांना वाचनाचा अतिशय नाद होता. विश्वासू व कर्तबगार सहकारी निर्माण करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. लक्ष्मणरावांच्या यशाचे रहस्य म्हणजे ग्राहकांच्या गरजांची पूर्वजाणीव आणि वस्तूच्या उत्कृष्ट गुणवत्तेचा आग्रह.

कणखर शिस्त, पद्धतशीर काम, जगभर आपला माल लोकप्रिय करण्याची तीव्र आकांक्षा, हे त्यांचे वर्तनसूत्र होते. किर्लोस्करवाडीची रचना करताना "कॅडबरी' किंवा "नॅशनल कॅश रजिस्टर' या सुविख्यात पश्‍चिमी कंपन्यांनी बांधलेल्या औद्योगिक वसाहती त्यांच्या नजरेसमोर होत्या. कारखान्याचे स्वतःचे एखादे मासिक असावे, हीही त्यांची एक आधुनिक कल्पना होती. 1969 मध्ये भारत सरकारने लक्ष्मणरावांची जन्मशताब्दी देशभर साजरी केली. त्यानिमित्ताने टपाल खात्याने वीस पैशांचे एक तिकीटही काढले असल्याचे मराठी विश्‍वकोशमध्ये नोंद आहे. 

शंतनूरावांनी इंजिन व यंत्रसामग्री निर्यातीत मिळवले यश 
मराठी विश्‍वकोशमधील माहितीनुसार, लक्ष्मणरावांनंतर त्यांचे चिरंजीव शंतनूराव किर्लोस्कर उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि प्रमुख सूत्रधार बनले. वीसहून अधिक कारखान्यांचे ते संचालक होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. शालेय शिक्षण औंध व पुणे येथे झाले. अमेरिकेतील मॅसॅचूसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी या जगविख्यात संस्थेत अभियांत्रिकीमधील बीएस्सी ही पदवी मिळवली.

1926 मध्ये किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात कामास सुरवात केली. 1935 मध्ये किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे उपव्यवस्थापक. 1941 नंतर हरिहर, खडकी, पुणे, बंगळूर, हुबळी, देवास, हडपसर, कोथरूड, कराड, नाशिक आदी ठिकाणी विविध यांत्रिक सामग्रींचे किर्लोस्कर कारखाने स्थापण्यात पुढाकार घेतला.

इंजिने व इतर यंत्रसामग्री आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका या खंडांतील देशांस मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात त्यांनी यश मिळविले. कोलकता येथील "इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉडक्‍शन एंजिनिअर्स'च्या "इंडिया कौन्सिल'ने दिलेल्या "सर वॉल्टर पुकी पारितोषिका'चे ते मानकरी ठरले. 1965 मध्ये भारत सरकारने शंतनूरावांना पद्मभूषण पदवी देऊन गौरविले. 

शंकररावांनी केला किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचा प्रारंभ 
किर्लोस्कर घराण्यातील तिसरी कर्तबगार व्यक्ती म्हणजे शंकरराव वासुदेव किर्लोस्कर ही होय. यांचे शालेय शिक्षण बेळगाव व सोलापूर येथे झाले. पुढे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये एक वर्ष काढून त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला. 1914 पासून किर्लोस्करवाडीस विक्री-व्यवस्थापक, प्रचारक व कार्यालय-व्यवस्थापक म्हणून काम सुरू केले. लंडनमध्ये त्यांनी विक्रीशास्त्राची पदविकाही मिळविली.

1920 मध्ये किर्लोस्कर छापखान्याची स्थापना झाली. त्यातूनच "किर्लोस्कर', "स्त्री' व "मनोहर' या मासिकांचे संपादन व प्रकाशन करण्यास त्यांनी प्रारंभ केला. मराठीत ही तिन्ही मासिके अनेक दृष्टींनी क्रांतिकारक ठरली. विशेषतः मासिक-प्रकाशनाचे निकोप असे व्यवसायीकरण करून ते यशस्वी करण्यात शंकररावांचा वाटा फार मोठा आहे. या मासिकांतून सतत पुरोगामी दृष्टिकोनाचा व तशाच प्रकारच्या ललित व वैचारिक लेखनाचा त्यांनी पुरस्कार केला.

चित्रे, छायाचित्रे व इतर सजावट यांनी मासिकांना आकर्षक व कलात्मक असे रूप देण्यातही शंकररावांनीच पुढाकार घेतला. मराठीत अनेक लेखक व विचारवंत घडविण्याचे कार्य या मासिकांनी केले आहे. "डेक्कन मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन'ची स्थापना, "मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज'चे कार्य, "कोयना धरण योजने'चा प्रथमपासून पाठपुरावा आदींतून शंकररावांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणास चालना देणारे ठरले असल्याचेही मराठी विश्‍वकोशमध्ये म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com